Shashikant Shinde | सरकारकडून राजकीय व सांस्कृतिक अतिक्रमणांची मालिका : आ. शशिकांत शिंदे
कोरेगाव : भाजपसह महायुती सरकारच्या काळात महाराष्ट्रावर राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमणांची मालिका सुरू झाली आहे. सरकारकडून मराठी भाषेची गळचेपी केली जात आहे. महाराष्ट्राच्या अस्मिता आणि भाषिक अभिमानाच्या रक्षणासाठी लढा देण्याचा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
आ. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत अठरापगड जाती एकत्र येऊन दिल्लीचा तख्त हलवला होता. आज त्याच महाराष्ट्रावर दिल्लीकडून राजकीय आणि भाषिक आक्रमण केले जात आहे. विशेषतः, मराठी भाषेच्या अस्तित्वावरच गदा आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ही बाब अत्यंत गंभीर बाब आहे. तामिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ यासारख्या राज्यांमध्ये स्थानिक भाषेला सर्वोच्च स्थान दिले जाते. तिथे हिंदीची सक्ती होत नाही.
मात्र महाराष्ट्रात मात्र केंद्र सरकारच्या दबावाखाली स्थानिक अस्मिता डावलली जात असेल, तर हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर घाला आहे. महाराष्ट्राच्या मातृभाषेला गळचेपीचा धोका निर्माण झाला आहे. मराठी माणूस अस्मितेच्या मुद्द्यावर कधीही माघार घेत नाही. गरज पडल्यास मराठी जनतेला रस्त्यावर उतरावे लागेल, हे सरकारने लक्षात घ्यावे. यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही आ. शशिकांत शिंदे यांनी केली.

