

कराड : भारतीय चित्रपटसृष्टीतील ऐतिहासिक स्थान मिळवलेल्या ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाची पुनर्संचयित (रेस्टोर्ड) आणि न कापलेली (अनकट) आवृत्ती आता आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर होणार आहे. हा चित्रपट 27 जून रोजी इटलीतील इल सिनेमा रिट्रोवाटो या नामांकित वार्षिक चित्रपट महोत्सवात जागतिक प्रीमियरसाठी प्रदर्शित केला जाणार आहे.
‘शोले’ या रमेश सिप्पी दिग्दर्शित चित्रपटाला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, विशेषतः या चित्रपटाची मूळ न कापलेली आवृत्ती प्रेक्षकांसमोर आणली जात आहे. या नव्या आवृत्तीत सुरुवातीला सेन्सॉरमुळे वगळलेला मूळ शेवट दाखवण्यात येणार आहे. मूळ कथानकानुसार, चित्रपटाच्या शेवटी ठाकूर (संजीव कुमार) गब्बर सिंगला (अमजद खान) स्वतः ठार मारतो. मात्र, सेन्सॉर बोर्डाच्या हस्तक्षेपामुळे हा शेवट बदलण्यात आला होता आणि गब्बरला पोलिसांच्या हवाली केलं जातं. आता या नव्या पुनर्संचयित आवृत्तीत गब्बरच्या शेवटचा मूळ सीन आणि चित्रपटातील काही हटवलेली दृश्ये पुन्हा जोडण्यात आली आहेत. त्यामुळे चित्रपटाची मूळ भावना आणि दिग्दर्शक रमेश सिप्पी यांची संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे.
चित्रपटात अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीव कुमार आणि अमजद खान यांच्या भूमिका आजही अमर झाल्या आहेत. या चित्रपटाने भारतीय सिनेमात मैलाचा दगड निर्माण केला असून, आजही ’शोले’ हे नाव भारतीय प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. या ऐतिहासिक पुनर्संचयनाबाबत अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, ’शोले’ हा चित्रपट केवळ मनोरंजन नव्हे, तर भारतीय चित्रपटांचा एक अमूल्य वारसा आहे. या चित्रपटाला पुन्हा नव्या रूपात जागतिक स्तरावर सादर होण्याची संधी मिळणं, ही मोठी अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.चित्रपटप्रेमींसाठी ‘शोले’ची ही नवी आवृत्ती म्हणजे एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पर्वणी ठरणार आहे.
भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वोच्च ठरलेल्या शोले या चित्रपटाची 4घ तंत्रज्ञानात पुनर्संचयित आवृत्ती तयार करण्यात आली आहे. ‘शोले’चे पुनर्संचयन अत्यंत बारकाईने करण्यात आले असून, या प्रक्रियेसाठी जगभरातील सर्वोत्तम उपलब्ध चित्रपट स्रोत वापरण्यात आले. यूकेमधील एका गोदामात सापडलेले एक इंटरपॉझिटिव्ह आणि दोन कलर रिव्हर्सल इंटरमिजिएटस् तसेच सिप्पी फिल्म्सने 1978 मध्ये जतन केलेले दुसरे इंटरपॉझिटिव्ह वापरून ही पुनर्संचयित आवृत्ती तयार झाली आहे. हे महत्त्वाचे साहित्य फिल्म हेरिटेज फाऊंडेशन (एफएचएफ) कडे सुरक्षित होते. चित्रपटाच्या ध्वनी पुनर्संचयितीसाठी मूळ साउंड निगेटिव्ह आणि एफएचएफकडे सुरक्षित असलेली मॅग्नेटिक साउंडट्रॅक वापरण्यात आली.
मूळ चित्रपट 35 मिमीवर चित्रीत करण्यात आला होता आणि 70 मिमीवर प्रदर्शित झाला होता. सध्या कोणतीही 70 मिमी प्रिंट उपलब्ध नसल्याने, ही आवृत्ती 4घ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मूळ 70 मिमी फ्रेम रेशो (2.2:1) मध्ये पुन्हा तयार करण्यात आली आहे.मूळ कॅमेरा निगेटिव्हची अवस्था अत्यंत खराब होती. व्हिनेगर सिंड्रोम, फिल्म चिकटणे, वलय तयार होणे, फिल्मचा तळ आणि इमल्शन बाजू खराब होणे तसेच फिल्म वाकडी होणे असे विविध दोष त्यामध्ये आढळले. या 4K पुनर्संचयित आवृत्तीत दिग्दर्शकाची मूळ आवृत्ती (Director's Cut) सादर करण्यात येत असून, त्यामध्ये चित्रपटाचा मूळ शेवट आणि दोन काढून टाकलेली दृश्ये देखील समाविष्ट करण्यात आली आहेत.