

सातारा : करंजे, ता. सातारा येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करुन घरातून रोकडसह सुमारे 4 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अभिजित हिरालाल दोशी (वय 50, रा. करंजे तर्फ सातारा) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 9 ते 10 डिसेंबर या कालावधीत घडली आहे. चोरट्यांनी घराचा सेफ्टी दरवाजाचा व लाकडी दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला. घरात प्रवेश करुन घरातील 1 लाख रुपये किंमतीचा 5 तोळ्याचा सोन्याचा हार, 50 हजारांचा अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस, 26 हजाराची दीड तोळ्याची सोन्याची चेन, 5 ग्रॅमच्या 2 नथ, चांदीचे अनेक दागिने, रोख 50 हजार रुपये असा एकूण 3 लाख 79 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
घरफोडीची घटना समोर आल्यानंतर याबाबतची माहिती शाहूपुरी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. ठसे तज्ज्ञ यावेळी पाचारण करण्यात आले. पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.