

सातारा : पुढारी वृत्तसेवा
राज्यात मुलींच्या सुरक्षिततेबाबत अनेक घटना समोर येऊ लागल्या आहेत. सातारा जिल्ह्यात मुलींबाबत गैरकृत्यांच्या घटना घडू नये, यासाठी जिल्हा पोलिस दलाने सरसावण्याची गरज निर्माण झाली आहे. घरातून, शाळेतून व पोलिसांकडून पोरींना गुड टच आणि बॅड टचची माहिती मिळाली पाहिजे. यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. दरम्यान, जिल्ह्यात निर्भया पथक, बीट मार्शल, पीसीआर व्हॅन यांच्याकडून गस्त घालून अधिक जनजागृती झाली पाहिजे. कोलकाता, बदलापूर, कोल्हापूर याठिकाणी मुलींबाबत घडलेल्या गैरकृत्यांनी समाजमन सुन्न झाले. एकामागून एक घटना घडू लागल्याने पालक काळजीत पडले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्यात बसस्टॉप ते कॉलेज, शाळा यादरम्यान जाताना मुली सुरक्षित नसल्याने त्यांना पोलिस व्हॅनद्वारे सोडावे लागल्याचे
वास्तव पाहिले आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा पोलिस दलाने निर्भया पथकाची स्थापना करत जनजागृतीचा धडाका केला. पोलिस तसेच स्वंयसेवी सामाजिक संघटनेकडून मुली, युवती व महिलांना खबरदारीचे उपाय प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्यात आले. यानंतर मात्र ही बाब काळानुरुप मागे पडून गेली. आजही दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत मुली शाळा-कॉलेज तसेच क्लासेससाठी बाहेर पडतात. प्रत्येक ठिकाणी जाताना तिला निर्भय वाटणे हे सामाजिक दृष्टीने गरजेचेच आहे. दुर्देवाने मात्र आजही मुली, युवती व महिलांना निकोप वातावरण वाटत नाही. राज्यातील वाढत्या घटनांनी त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. यासाठी सातारा जिल्हा पोलिस दलाने वेळीच उपाययोजना राबवणे क्रमाप्राप्त बनले आहे.
शाळा, कॉलेज, क्लासेस तसेच बसस्थानक परिसरात टपोरी करणार्यांचा राबता कायम असतो. यासाठी पोलिसांनी बीट मार्शल, पीसीआर व्हॅनद्वारे अशा टपोरीगिरांवर वॉच ठेवून त्यांना फटके दिले पाहिजेत. मुलींनी तक्रार केली की, तत्काळ त्याची दखल घेवून शहानिशा करत कायदेशीर कठोर कारवाई केली पाहिजे. यासाठी टवाळखोर मुलांच्या कुटुंबीयांना बोलावून त्यांच्या समक्ष समज दिली पाहिजे.
सातारा पोलिस दलाच्यावतीने पाच वर्षांपूर्वी शाळांमध्ये मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे शिकवले गेले आहे. त्यासोबत प्रभावीपणे जनजागृती केली. पुन्हा एकदा अशाच पद्धतीने कराटेचे प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. यासोबतच हेल्पलाईनचा प्रभावी वापर झाला पाहिजे. डायल 112 यासोबतच सर्व पोलिस ठाण्यांचे क्रमांक त्या परिसरात शाळा-महाविद्यालयांमध्ये असले पाहिजेत. मुलींच्या वसतीगृहांमध्ये जाऊन कायद्याची दिली गेली पाहिजे.