

सातारा : अल्पवयीन मुलीवर सातार्यातील पोवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट मार्गावरील पर्ल लॉजमध्ये अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संशयित गेल्या दोन वर्षांपासून मुलीची छेड काढून त्रास देत होता. दरम्यान, मुख्य संशयिताला सहकार्य केल्याप्रकरणी दोन मित्रांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
ऋषीकेश संभाजी मदने (वय 25, रा. खटाव), दीपक जाधव, अंकुश मदने अशी संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी 15 वर्षीय मुलीने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अत्याचाराची घटना दि. 2 ऑगस्ट रोजी घडली.
अधिक माहिती अशी : संशयित ऋषीकेश मदने हा या अगोदरही मुलगी शाळेत जात असताना वारंवार छेड काढत होता. तसेच धमकावत होता. या घटनेमुळे मुलगी घाबरून गेली होती. याचाच गैरफायदा घेत संशयितांच्या टोळीने 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता धमकी देऊन मुलीला भेटायला बोलावून घेतले. यावेळी संशयित मदनेकडे एमएच 12 एचएन 4131 या क्रमांकाची कार होती. कारमध्ये मुलगी बसल्यानंतर इतर संशयित खाली उतरले.
ऋषीकेश मदने याने कारमध्ये मुलीची छेड काढत तिच्यासोबत अश्लिल चाळे केले. यामुळे मुलगी घाबरली व तिने प्रतिकार केला. मात्र संशयिताने जीवे मारण्याची धमकी मुलीला दिली. संशयिताने मुलीला हॉटेल पर्ल येथे नेले आणि अत्याचार केला. दरम्यान, संशयीत 2023 पासून वेळोवेळी मुलीची छेड काढत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातार्यातील लॉज मोकाट
सातारा शहरात गेल्या काही वर्षांपासून लॉजमध्ये अनेक गैरप्रकार घडत आहेत. अल्पवयीन मुला-मुलींना लॉज देण्याबाबत सूचना आहेत. मात्र, त्याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. तीन वर्षांपूर्वी अत्याचार प्रकरणात लॉज मालकांनाही सहआरोपी केल्याच्या घटना घडल्या आहेत, तरीही लॉजमध्ये अल्पवयीन मुलींना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे सातार्यातील लॉज चालक मोकाट झाल्याचे चित्र आहे.