

तासवडे टोलनाका : घोणशी, ता.कराड या गावाचा सिटी सर्व्हे न झाल्याने ग्रामस्थांच्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम दै.‘पुढारी’ने सचित्र बातमीसह केले. दै. ‘पुढारी’ मध्ये ‘घोणशी गाव हरवले प्रशासनाला नाही सापडले’ हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासना खडबडून जागे झाले. प्रशासनाच्या हालचाली वाढल्या असून, घोणशी गावच्या सिटी सर्व्हेबाबत कराड प्रांतअधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सर्व प्रशासकीय अधिकार्यांची सोमवारी 21 जुलैला बैठक आयोजित केली आहे. त्यामुळे ‘पुढारी’च्या दणक्याने प्रशासन कामाला लागले असून घोणशी ग्रामस्थांना गावाचा सिटी सर्व्हे होण्याची आशा निर्माण झाली आहे.
1968 पासून आजतागायत सर्व ग्रामस्थ गावाचा सिटी सर्व्हे व गावठाण मंजूर व्हावे याबाबत संघर्ष करत आहे. 1982 ला प्रशासनाने घोणशीतील काही ग्रामस्थांना भूखंड दिले. 1982 ला दिलेल्या भूखंडाबरोबरच गावातील सर्व भूखंडाची कब्जेपट्टी किंवा सनद ग्रामस्थांच्याकडे नाही. त्यामुळे गावातील सर्व भूखंडाची मालकी अजुनही शासनाकडेच आहे. तसेच भूखंड वितरित करण्यात आल्याचे आदेश मागितला; परंतु तोही प्रशासनाच्या दप्तरी नाही असे सांगत अधिकार्यांनी आपले हात वर केले. त्यानंतर ग्रामस्थांनी सिटी सर्व्हेसाठी निकराचा लढा देत आंदोलने केली, आमरण उपोषणही केले; परंतु प्रशासन जागचे हालले नाही.
दरम्यान, याबाबत चर्चा करण्यासाठी गावात येतो सर्व कागदपत्रे घेऊन ग्रामपंचायत उपस्थित रहा असे प्रशासनाकडून दोन वेळा सांगण्यात आले.परंतु दोन वेळा तारखा देऊनही प्रशासनातील कोणतेही अधिकारी घोणशी गावात आले नाही. गेल्या पन्नास वर्षापासून गावातील सर्वसामान्य शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी, भूमिहीन मजूर व कष्ट करणारे मजूर हे राहत्या घराची जागा आपल्या नावावर होण्यासाठी धडपडत आहेत .
दरम्यान, प्रशासन कोणतीही दखल घेत नसल्यामुळे घोणशी ग्रामस्थांनी ‘पुढारी’कडे पन्नास वर्षापासून गावाचा सिटी सर्व्हे होण्यासाठी केलेल्या संघर्षाच्या व्यथा मांडल्या. यानंतर पुढारीने सलग दोन दिवस सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. घोणशी गावा संदर्भातील मागील 50 वर्षातील सर्व कागदपत्रे तपासली जात आहेत. तसेच गावासाठी नऊ दिवस आमरण उपोषण करणारे विजय सोनवले यांच्याशी गटविकास अधिकारी प्रताप पाटील व नायब तहसीलदार बाबुराव राठोड यांनी चर्चा केली. गावाच्या प्रश्नासाठी सोमवारी प्रांतअधिकार्यांनी बैठक आयोजित केल्याचे सांगितले आहे. या बैठकीस प्रांतअधिकारी अतुल म्हेत्रे ,कराड तहसीलदार कल्पना ढवळे ,नायब तहसीलदार बाबुराव राठोड ,गटविकास अधिकारी प्रताप पाटील, विस्तार अधिकारी विकास स्वामी, मंडलअधिकारी पेंडसे, तलाठी राजेश देशमुख, व ग्रामविकास अधिकारी प्रसाद यादव उपस्थित राहणार आहेत.