

तासवडे टोलनाका : कराड शहरापासून जेमतेम दहा किलोमीटरवर घोणशी गाव आहे. हे गाव परिसरातील ग्रामस्थांना माहीत आहे व गावात काम करणार्या शासकीय अधिकार्यांना; मात्र 50 वर्षांपासून घोणशी गावचा सिटी सर्व्हे झाला नसल्याने सातारा जिल्ह्यातून कागदोपत्री संपूर्ण घोणशी गावच हरवले आहे. गेल्या 50 वर्षांत प्रशासनाकडून शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु अजूनही सापडले नाही, असे म्हणण्याची वेळ घोणशी ग्रामस्थांवर आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराने ग्रामस्थ मात्र हवालदिल झाले आहेत.
घोणशी गावात 200 ते 300 घरे असून लोकसंख्या साधारण 2500 च्या आसपास आहे. गावाची ग्रामपंचायत 1962 दरम्यान स्थापन झाली आहे. पूर्वी हे गाव कृष्णा नदीकाठी जानुबाई मंदिरालगत होते. त्यानंतर 1968 पासून घोणशी ग्रामस्थांनी नदीपासून दूर एका टेकडीवर गाव स्थापित केले. दरम्यान हे करत असताना गावातील तत्कालीन सरपंच, उपसरपंच यांनी शासन दरबारी नवीन गावठाण मंजुरीसाठी अनेक हेलपाटे मारले. परंतु शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे त्यांच्या पदरी उदासीनताच पडली.
1968 च्या अगोदर ज्यावेळी घोणशीगाव नदीकाठी होते त्यावेळीही त्या ठिकाणचा शासनाकडून सिटी सर्व्हे झाला नव्हता. त्यानंतर नवीन ठिकाणी गाव स्थापन झाल्यानंतर आजपर्यंत जवळजवळ 50 वर्षात अजूनही गावचा सिटी सर्व्हे झाला नाही. यामुळे गावातील ग्रामस्थांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागते. यामध्ये मुलांचे शिक्षणासाठी कर्ज,घरासाठी , व्यवसायासाठी कर्ज काढताना त्यांना भरपूर त्रासाला सामोरे जावे लागते.
1989 ला या परिसरातील वहागाव, खोडशी, मुंढे या गावांचा शासनाकडून सिटी सर्व्हे करण्यात आला. परंतु वहागावपासून एक किलोमीटर अंतरावर असणार्या घोणशी गावाचा मात्र शासनाला विसर पडला. या गावातील लोकांना मतदानाचा अधिकार आहे. ते ग्रामपंचायतीच्या सर्व शासकीय योजनांचा लाभ घेतात. तसेच राजकीय निधीही गावाला मिळाला आहे. परंतु सिटी सर्व्हे नसल्यामुळे ज्या ठिकाणी या ग्रामस्थांनी पन्नास वर्षांपूर्वी आपली घरे बांधले आहेत त्या जागेची मालकी मात्र या ग्रामस्थांच्याकडे नाही. त्यांच्या घराची नोंद फक्त ग्रामपंचायतमध्ये कागदोपत्री 8 अ उतार्याला आहे. ग्रामपंचायत दप्तरी फक्त 8 अ उतार्याला घराची नोंद असल्यामुळे मागील पन्नास वर्षांत जागेवरून ग्रामस्थांच्या अनेक वाद विवाद झाले आहेत.
जागेवरून पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय तसेच न्यायालयात अनेक खटले एकमेकांचे विरोधात सुरू आहेत. गावामध्ये अनेक अल्प भूधारक शेतकरी, भूमिहीन शेतमजूर, मजूर आहेत. ते सर्वजण गेल्या 50 वर्षांपासून त्या जागेवर आपली घरे बांधून राहत आहेत. परंतु जागेची मालकी नसल्याने त्यांची अनेक वर्षांपासून परवड सुरू आहे. त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वी घोणशी गाव हरवलं परंतु अजूनही प्रशासनांन नाही सापडलं अशी स्थिती आहे.