Living with animals: प्राण्यांसोबत जगण्याची सवय लावून घ्या

बिबट्या, मगरी, गवे, तरस, घोणसचा मानवी वस्तीत वावर
Living with animals |
Living with animals: प्राण्यांसोबत जगण्याची सवय लावून घ्या(File Photo)
Published on: 
Updated on: 
नंदू गुरव

सांगली : जंगलात आत-आत राहणारी जनावरं मानवी वस्तीत कशी काय यायला लागली? का यायला लागली? कुणामुळं यायला लागली?.. याचं उत्तर ‘माणसामुळं..’ असंच द्यावं लागतं. माणसांच्या चुकांची फळं प्राणी-पक्ष्यांना भोगावी लागत आहेत. आता जनावरांसोबत जगण्याची सवय लावून घ्या, असा सल्ला प्राणी आणि पक्षीमित्र देताहेत.

राष्ट्रीय वन्यजीव दिन दरवर्षी 4 सप्टेंबररोजी साजरा केला जातो. तो कशासाठी? तर वन्यजीव आणि त्यांच्या अधिवासाचं संरक्षण व्हावं, याचं भान माणसाला येण्यासाठी. माणसानं डोंगर, जंगलात अतिक्रमण केलं, म्हणून बिबट्या, तरस, गवे माणसाच्या वस्तीत यायला लागले आहेत. माणसानं नदी खरवडून टाकली म्हणून मगरी नदीकाठच्या शेतात यायला लागल्या आहेत. माणसानं डोंगरावर झाडंच ठेवली नाहीत, म्हणून माकडं मंदिरात, गावात यायला लागली. आता तर माणसाचं हे निसर्गातलं अतिक्रमण इतकं भयंकर पातळीवर गेलं आहे की त्यातून पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश धोक्यात आले आहेत.

निसर्गसाखळीला बाधा पोहोचली आहे. फुले, झाडे, पशु, पक्ष्यांच्या अनेक जाती कायमच्या संपल्या आहेत. ज्या उरल्या आहेत, त्यांचंही अस्तित्व धोक्यात आले आहे. निसर्ग जगला, तर आपण जगू, याचे भान माणसाला यावं, यासाठी राष्ट्रीय वन्यजीव दिन साजरा केला जातो खरा, पण एक दिवसाच्या औपचारिकतेनं काय साध्य होणार असा सवाल प्राणिमित्र करत आहेत.

मुळात, माणूसच वन्यजीवांच्या अधिवासात घुसला आहे. कोणताही वन्यप्राणी पुन्हा-पुन्हा मानवी वस्तीत येऊ लागतो, त्याला काही ठरावीक कारणे असतात. अधिवास नष्ट झाल्याने नवीन अधिवासाचा शोध, संसाधने कमी पडू लागल्याने नवीन संसाधनांना शोध, पिल्ले मोठी झाल्यावर त्यांचा स्वतःच्या अधिवासाचा शोध आणि मानवी वस्तीमध्ये सहज मिळणारा निवारा, अन्न अशी कारणे सांगता येतील.
विकासाच्या गोंडस नावाखाली होत असलेली प्रचंड वृक्षतोड, जंगल आणि नदीच्या आसपास होत असलेले मानवी अतिक्रमण, डोंगर पोखरून माती, मुरूम, दगड उपसा यामुळे वन्यप्राण्यांची आश्रयस्थाने नष्ट होत चालली आहेत. जंगलेच राहिली नाहीत, तर जंगली जनावरांनी जायचे कुठे? माणसात आलेल्या जनावरांची सवय करुन घ्यावी लागेल.
- अजित काशिद, अध्यक्ष, अँनिमल सहारा फौंडेशन, सांगली.
शहरीकरण आणि जंगलतोडीमुळं पक्षांचे अधिवास नष्ट झाले आहेत. किटकनाशके, ध्वनीप्रदूषण, लेसर यांचाही पक्षांवर परिणाम झाला आहे. बेकायदेशीर शिकार व व्यापार, हवामान बदल, पाण्याचा व नैसर्गिक अन्नाचा अभाव, फळझाडे व फुलझाडांचा अभाव, आधुनिक घरे व इमारती रचना, यामुळे पक्ष्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. पक्षांसाठी शामरावनगर, कर्नाळ रोड अशा काही जागा आरक्षित केल्या पाहिजेत.
- डॉ. नंदिनी पाटील, पक्षी निरीक्षक, सांगली.
अस्वच्छता वाढली की उंदीर वाढतात आणि ते वाढले की त्यांना खाण्यासाठी साप मानवी वस्तीत येतात, असे चक्र आहे. 2005 च्या महापुरानंतर घोणस नागरी वस्तीपर्यंत आला. आता बर्‍याच लोकवस्तीत त्याचा वावर दिसतो. काळजी घेणे हाच पर्याय आहे.
- युनस मणेर, सर्पमित्र, उरुण इस्लामपूर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.