

सातारा : जिल्हा परिषद चौक ते सर्किट हाऊस रस्त्यावर फळ विक्रेत्यांनी उकिरडा केला आहे. गजबजलेल्या या रस्त्यावर फळ विक्रेत्यांनी सडलेली कलिगंडे भर रस्त्यावर टाकली आहेत, तर आंब्यांच्या लाकडी पेट्याही टाकण्यात आल्याने परिसराला बकाल स्वरूप आले आहे. सडलेल्या कलिंगडामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे संबंधित फळ विक्रेत्यांवर नगरपालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
सातारा जिल्हा परिषद चौक ते सर्किट हाऊस दरम्यानच्या रस्त्यावर नेहमीच नागरिकांची वर्दळ असते. या परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कलिंगडे व आंबे विक्रीसाठी आले आहेत. हे विक्रेते दर्शनी भागातच बसले असल्याने फळे घेण्यासाठी नागरिकांची कायम गर्दी असते. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून एका कलिंगडे विक्रेत्याने सडलेली कलिगंडाचे कॅरेट भर रस्त्यावरच टाकले आहेत. यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
आंब्याच्या मोकळ्या लाकडी पेट्याही अस्ताव्यस्त टाकल्या आहेत. त्यामुळे या परिसराला बकाल स्वरूप आले आहे. दररोज या रस्त्यावर पहाटे व सायंकाळी फिरावयास येणार्या नागरिकांची गर्दी असते. मात्र, या दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
गेल्या 3 ते 4 दिवसांपासून याठिकाणाहून जाता येता नागरिकांना नाकाला रूमाल लावूनच जावे लागत आहे. अस्ताव्यस्त आंब्याच्या पेट्यामुळे स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. यालगतच जिल्हा परिषदेची इमारत असून तेथेही मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर असतो. त्यांच्याही आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो.
याच मार्गावर सर्कीट हाऊस असल्याने जिल्ह्यातील मंत्र्यासह राज्यातील मंत्र्यांचा कायम राबता असतो. तसेच मंत्रालयासह अन्य वरिष्ठ अधिकार्यांची ये-जा या ठिकाणी असते. भर वर्दळीच्या रस्त्यावरच अस्ताव्यस्त सडलेल्या कलिगंडामुळे परिसर अस्वच्छतेच्या विळख्यात सापडला आहे. नगरपालिका प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांवर कारवाई करून हा परिसर स्वच्छ करावा, अशी मागणी होत आहे.