

सातारा : ऊसतोडीपोटी इसार घेऊन पसार झालेल्या ऊस तोडणी मुकादम व मजुरांवर फलटण शहर, फलटण ग्रामीण व लोणंद पोलिस ठाण्यांमध्ये अवघ्या एका वर्षात अजामीनपात्र 37 गुन्हे दाखल झाले आहेत. या ऊस टोळ्यांनी शेतकर्यांची व साखर कारखान्यांची तब्बल 5 कोटी 42 लाख 7 हजार 605 रुपयांची फसवणूक केली आहे. जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एकूण गुन्ह्यांतील फसवणुकीचे आकडे डोळे पांढरे करणारे असू शकतात. गुन्हे दाखल झालेल्यांपैकी काही मुकादम डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येआड लपण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी आहेत. फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांची करोडो रुपयांची फसवणूक करणार्या ऊसतोड मुकादमांनाही शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सातारा जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
बीड, उस्मानाबाद परिसरातून ऊसतोड कामगार जिल्ह्यामध्ये गाळप हंगामामध्ये ऊसतोडीसाठी दाखल होतात. साखर कारखान्यांच्या ऊस वाहतूकदारांमार्फत ऊसतोडणी मजुरांना इसार देऊन तसेच त्यांचा प्रवास खर्च करुन आणतात. मुकादम तोडणीपूर्वी अडवून लाखो रुपयांचा इसार घेतात. अनेकदा ऊसतोडणी टोळ्या न पाठवता फसवणूक केली जाते. तसेच रक्कम परत मागायला गेलेल्या वाहतुकदारांवर सामुहिक हल्ले करण्याचे प्रकारही यापूर्वी झालेले आहेत. सातारा जिल्ह्यात यापूर्वी अनेक पोलिस ठाण्यांमध्ये टोळी मुकादमांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. शेतकर्यांनी संघटीतपणे त्या त्या वेळेस जिल्हा पोलिस प्रमुखांशी संपर्क साधून अशा मुकादमांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
फलटण येथे डॉ.संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणादरम्यान टोळी मुकादमांच्या गुन्ह्यांचाही विषय समोर आला आहे. गुन्हे दाखल झालेल्या काही मुकादमांनी आत्महत्या प्रकरणाआड दडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. याच अनुषंगाने फलटण शहर, ग्रामीण पोलिस ठाण्यासह लगतच्या पोलिस ठाण्यांमध्ये ऊसतोड मुकादमांविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती आता समोर येवू लागली आहे.
फसवणूकप्रकरणी स्वराज कारखान्याने 14 गुन्हे दाखल केले असून या कारखान्याची 1 कोटी 17 लाख 73 हजार 963 रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दत्त साखर कारखान्याने 3 गुन्हे दाखल केले असून त्यांची 21 लाखांची फसवणूक झाली आहे. श्रीराम कारखान्याने 5 गुन्हे दाखल केले असून त्यांची 60 लाख 36 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माळेगाव कारखान्याची 4 लाख 85 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची एक तक्रार दाखल झाली आहे. शरयू कारखान्याची 9 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. एका कारखान्याची पोलिस दफ्तरी नोंद नसली तरी 4 लाख 47 हजार 500 रुपयांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये स्वराज कारखान्याने 33 लाख 50 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चार गुन्हे दाखल केले आहेत. विलास पालवे यांनी 10 लाख 10 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. लोणंद पोलिस ठाण्यामध्ये दत्त इंडिया कारखान्याने 4 लाख 18 हजार 500 रुपयांच्या फसवणूक प्रकरणी तीन तक्रारी दाखल केल्या आहेत. शरयू कारखान्याने 1 कोटी 38 लाख 57 हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी चार तक्रारी दाखल केल्या आहेत.
जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांमध्येही गुन्हे दाखल असून तक्रारींचे मोठे घबाड बाहेर येऊ शकते, तसेच फसवणूक करणार्या टोळ्यांचा पर्दाफाशही होऊ शकतो. या मुकादमांनी साखर कारखान्यांसोबतच पश्चिम महाराष्ट्रातील सामान्य ऊस उत्पादक शेतकर्यांची देखील फसवणूक केल्याच्या तक्रारी आहेत. ऊसतोडणीसाठी लाखो रुपयांचा इसार घेणारे हेच लोक ऊसतोडीसाठी टोळी न पाठवता पसार झाले आहेत. तसेच हेच पैसे परत मागायला गेलेल्या लोकांना कोयता दाखवून दहशत निर्माण करत असल्याच्याही तक्रारी आहेत.
डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळालाच पाहिजे; पण फसवणूक करणार्या टोळी मुकादमांवरही कारवाई हवी
डॉ.संपदा मुंडे यांची झालेली आत्महत्या दुर्दैवीच आहे. मात्र, गुन्हे दाखल झालेले काही टोळी मुकादम संघटितपणे एकत्रित येऊन या आत्महत्येच्या आड दडत आहेत. सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांची त्यांनी फसवणूक केली आहे. उचल घेऊन पसार होऊन त्यांनी टोळ्या घेऊन चला असे सांगायला गेलेल्या सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांना अनेकदा हाकलून दिले आहे, अनेकदा मारहाणही केली आहे. आत्महत्याग्रस्त मुलीला न्याय मिळालाच पाहिजे. तिच्या पाठीमागे संपूर्ण सातारा जिल्हा उभा आहे. एसआयटीच्या नियुक्तीने डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळेलच. मात्र, त्याचवेळी सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांची फसवणूक करणार्या मुकादमांवरही कायद्याने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सर्वसामान्य शेतकरी करत आहेत.
एकेका शेतकर्याकडून लाखो रुपये उचल घेऊन हे टोळी मुकादम पसार झाले आहेत. त्यांनी त्यांच्या भागातील ऊसतोड मजुरांचीही फसवणूक केली आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांवर तिथे आल्यावर हल्ले केले आहेत. त्याबाबतच्या लेखी तक्रारी त्या त्या पोलिस ठाण्यात आहेत. आता यातीलच काही महाभाग आत्महत्या प्रकरणाचा आसरा घेत आहेत. आत्महत्या प्रकरणाचा निर्णय झाला पाहिजे; पण टोळी मुकादमांनाही त्यांच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळायला हवी, ही सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकर्यांची मागणी आहे.