Farmers cheated gang: शेतकर्यांची फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश
फलटण : सरकारी कामाच्या खोट्या वर्क ऑर्डर दाखवून शेतकर्यांकडून ट्रॅक्टर, पोकलेन आदी वस्तू घेऊन दुसर्या राज्यात विकणार्या टोळीचा फलटण शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शेतकर्यांची फसवणूक करून 65 लाखाचे दोन ट्रॅक्टर व एक पोकलॅन मशिन हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी दोघांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद मुस्ताक मोहम्मद हुसेन (रा. चित्रदुर्ग, कर्नाटक) व ईदमा हबीब रहमान कुंजी बियारी (रा. मुडबिंद्री, कर्नाटक) अशी संशयितांची नावे आहेत.
पाच ऑगस्ट 2025 रोजी विनय संपत माने (रा. गोंदवले बुद्रुक, ता. माण) यांनी फेसबुकवर ट्रॅक्टर भाड्याने देण्याची जाहिरात केली होती. त्यानंतर संशयितांनी ठेकेदार असल्याचे भासवून दोन्ही वाहने करार करून कर्नाटकात नेली. काही दिवसांनी माने यांनी भाड्यासाठी फोन केला असता संशयिताने भाडे न देता मोबाईल बंद केला. संशयिताचा पत्ता व सरकारी कामाची वर्क ऑर्डर खोटी असल्याचे माने यांच्या लक्षात आल्याने यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी नायगाव, मुंबई येथून मुस्ताकला अटक केली. त्याचा साथीदार ईदमा यालाही अटक करण्यात आली. दोन्ही वाहने तामिळनाडूतून हस्तगत केली. पोनि हेमंतकुमार शहा, पोलीस उपनिरीक्षक विजय गाजरे, सहाय्य पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस पूनम बोबडे, काकासो कर्णे, अतुल बडे, जितेंद्र टिके यांनी ही कारवाई केली.

