

फलटण : दालवडी, ता. फलटण गावच्या हद्दीत गांजा, बंदूक आणि काडतुसे कारमध्ये ठेवल्याप्रकरणी रवींद्र कोलवडकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणात कोलवडकर यांना अडकवणार्या टोळीचा फलटण पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी चौघांना अटक केली तर खोटी फिर्याद देणार्यासह तीन जण पसार आहेत. दरम्यान, अॅकॅडमी व्यवसायाच्या वादातून या चौघांनी कोलवडकर यांना अडकवण्याचा प्लॅन केल्याचे उघड झाले आहे.
जयेश संपत जाधव (रा. किकवी ता. भोर जि. पुणे), अनिल सोमनाथ गजरे व ओमकार बापूराव खराडे (दोघेही रा. बारवकर नगर कांबळेश्वर, ता. बारामती), रोहन संतोष एडके (रा. पटकुल ता. मोहोळ जि.सोलापूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर कुमार उर्फ ज्ञानेश्वर मारुती परदेशी (रा.मिरगाव ता. फलटण), मुसा शिंदे (रा. बारवकरनगर), समीर त्रिंबक पवार (रा. फडतरवाडी, ता. फलटण) अशी पसार झालेल्या संशयितांची नावे आहेत. यामधील समीर पवार याने रवींद्र कोलवडकर यांना अडकवण्यासाठी खोटी तक्रार केली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती, दि. 27 ऑगस्ट रोजी फलटणमध्ये एका स्विफ्ट डिझायर गाडीमध्ये गांजा, पिस्तूल व जिवंत काडतुसे सापडली होती. याप्रकरणी पोलिसांनी रवींद्र कोलवडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कोलवडकर यांनी या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा जबाब दिला. कोलवडकर हे परदेशी याच्या अॅकॅडमीत शिकवत होते. मात्र, 2022 मध्ये त्यांनी स्वतंत्र अॅकॅडमी सुरू केली. यामुळे परदेशी याचा व्यवसाय कमी झाला. त्यामुळेच समीरला पुढे करून अॅकॅडमी बंद कर अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती. तसा अर्जही कोलवडकर यांनी न्यायालयात सादर केल्याचे सांगितले.
तसेच समीर पवार याने भरतीचे अमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले. यातूनच समीर पवार याने माझ्याविरोधात तक्रार दिल्याचे कोलवडकर यांनी पोलिसांना सांगितले. यासाठी त्याला कुमार परदेशी याने सांगितले होते.
या माहितीवरून पोलिसांनी रेकॉर्ड तपासले असता समीर पवार हाच फिर्यादी असल्याचे दिसून आले. रेकॉर्डवरील मोबाईल नंबर काढून शोध घेतला असता समीर हा पोलिसांना घरी मिळून आला नाही. त्यानंतर यातील मुख्य सूत्रधार कुमार परदेशी याचा तपास पोलिसांनी केला. तो सुद्धा आढळून आला नाही. मात्र, इतर संशयितांना पोलिसांनी अटक केल्यानंतर कुमार याच्या सांगण्यावरूनच कोलवडकर यांच्या वाहनात गांजा, बंदूक व काडतुसे ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयितांना न्यायायात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हनी ट्रॅप प्रकरणात पसार असलेला अनिल गजरे याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने, पोलीस हवालदार वैभव सूर्यवंशी, नितीन चतुरे, तात्या कदम, हनुमंत दडस, अमोल जगदाळे, तुषार नलावडे, रंगवाड काशीद यांनी केली.