

सातारा : साताऱ्यात गुरुवारी भरदिवसा टोळक्याने कोयत्यांनी एकाचा मर्डर केल्यानंतर शुक्रवारी पोलिस अधीक्षक तुषार दोशी ॲक्शन मोडवर आले. शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चौघांच्या टोळीला 4 जिल्ह्यांतून 2 वर्षांसाठी तडीपार केले. दरम्यान, पूर्ण व मुळासह गुन्हेगारी साफसफाईचे पोलिसांसमोर आव्हान कायम आहे.
प्रेम गणेश पवार (वय 21, रा. शुक्रवार पेठ सातारा), आनंदा ऊर्फ आण्णा लक्ष्मण माने (वय 20, रा. दिव्यनगरी, सातारा), प्रेम आबासाहेब अडागळे (वय 21, रा. शाहूपुरी, सातारा), अनिकेत सोमनाथ अहिवळे (वय 20, रा. मंगळवार पेठ, सातारा) अशी तडीपार केलेल्या टोळीतील संशयितांची नावे आहेत. या टोळीविरुद्ध दरोडा टाकणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्ता हिसकावून घेणे, मारामारी करणे, दुखापत पोहोचवणे, शिवीगाळ दमदाटी करणे यासारखे दखलपात्र स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांना अटक करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईदेखील केली होती, तरीही या टोळीने गुन्हेगारी कारवाया चालूच ठेवल्या होत्या. त्यांच्या टोळीवर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे सातारा तालुका परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता. या टोळीवर कायद्याचा वचक राहावा यासाठी सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.
शाहूपुरी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोनि सचिन म्हेत्रे यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 55 प्रमाणे संपूर्ण सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला. त्यानुसार हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर सुनावणी झाली. संशयितांना सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातून 2 वर्षे हद्दपार करण्यात आले.