

सातारा : प्रतापगडसह 12 किल्ल्यांना जागतिक वारसा युनेस्कोने दिल्याने त्यांचे जतन व संवर्धन होणार आहे. असे असताना वैभवशाली इतिहासाची साक्ष देणार्या राजवाड्याची मात्र दुरवस्था झाली असून तो बेवारस राहिल्याची खंत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते दीपक पवार यांनी व्यक्त केली आहे. तर सातारकरांनो आता शिवगर्जना बंद करावी. तब्बल 23 वर्षे छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा राजवाडा बंद आहे, असेही पवार म्हणाले.
दीपक पवार म्हणाले, एकीकडे प्रतापगडसह 12 शिवकालीन किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. यामुळे या किल्ल्यांचे जतन व संवर्धन होणार आहे. यामुळे आता शिवरायांचा इतिहास हा अटकेपार झळकणार आहे. असे असताना मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणार्या 1844 साली बांधण्यात आलेला राजवाडा मात्र बेवारस अन् दुर्लक्षित राहिला आहे. राजवाड्याकडे जायचे, डोळे बंद करायचे. पोवई नाक्यावर आले की छत्रपतींना मुजरा मारायचा आणि शिवप्रेम जागे करायचे.
जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, या शिवगर्जना आता फक्त व्यक्तीच्या, पक्षाच्या आणि संघटनेच्या स्वार्थापुरत्याच राहिलेल्या दिसतायेत. जागतिक पातळीवर छत्रपती शिवरायांच्या गडकोटांचा गौरव होतोय आणि सातारा शहरांमध्ये छत्रपती शिवरायांची राजधानी म्हणून उर बडवतो. तब्बल 23 वर्षे छत्रपती शिवरायांच्या राजधानीचा राजवाडा बंद आहे ज्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय. आपण डोळ्यांनी आंधळे आणि कानांनी बहिरे असे जाणीवपूर्वक करतोय. या गोष्टीची फार मोठी किंमत नुसती लोकप्रतिनिधींना नव्हे तर सातारकरांना मोजावी लागेल. इतिहास कोणाला माफ करत नाही. मी याबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला पण कोणालाही रस दिसेना असे लक्षात आल्याचे दीपक पवार यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, ज्यावेळी आपल्या प्रेरणेचा, वारसाचा, अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असेल त्यावेळी फक्त आणि फक्त सामान्य मनुष्य आंदोलन करून हा प्रश्न मिटवू शकतो. अमेरिकेमध्ये बसून तिथल्या व्यक्तींनी अभ्यास करुन छत्रपती शिवरायांच्या गडकोटांना मान्यता दिली. एवढेच नव्हे तर जगातील वेगवेगळ्या देशांमध्ये छत्रपती शिवरायांची युद्धनीती व त्यांचा राज्यकारभार हा अभ्यासला जातो. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांची वारसा स्थळे याच्याबद्दल आपण काय करायचं हे ठरवावे. बरेचवेळा राजवाड्याच्या बाजूला दारुडे, गर्दुले, चोरटे यांचे आसरा स्थान झाले आहे. त्याचप्रमाणे वाळवी, गंज, उंदीर, घुस, कचरा यांचा पसारा पडला आहे, तरी सुद्धा आपण बंद राजवाड्याचे टाळे ठोकू शकत नाही याच्यावरती सातारकरांनी विचार करणे गरजेचे आहे, असेही दीपक पवार यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी नाही म्हणून हात झटकून चालणार नाही. काहीजण राज्य करताना शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतात. काहीजण हिंदुत्वाच्या नावाखाली छत्रपती शिवरायांची शिवशाही आहे, असे समजतात. पण छत्रपती शिवरायांच्या वाड्याला आज वारस नाही हे फार मोठे दुर्दैव आहे. फक्त आणि फक्त छत्रपती शिवरायांचा वापर हा सर्वांनी तुम्ही, आम्ही जगण्यासाठी केला. प्रेरणा, कर्तव्य, अथवा जबाबदारी याच्याविषयी आपण किंचित देखील विचार करत नसल्याचे दीपक पवार यांनी पत्रकात म्हटले आहे.