

कराड : महाराष्ट्राचे माजी क्रीडा मंत्री व कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार जनार्दन उर्फ शामराव बाळकृष्ण आष्टेकर (वय 91) यांचे पुणे येथे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
सन 1985 आणि 1990 मध्ये झालेल्या निवडणुकीत कराड उत्तर विधानसभा मतदार संघातून त्यांनी विजय मिळविला होता. खा. शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, बंधू, सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.
शामराव ऊर्फ जनार्दन बाळकृष्ण आष्टेकर यांचा जन्म 2 ऑगस्ट 1934 मध्ये कराड येथे झाला. कराड पालिकेत 10 वर्षे उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. 1985 ते 1990 असे सलग 10 वर्षे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व त्यांनी केले होते. यातील 9 वर्षे क्रीडा, सांस्कृतिक व उद्योग विभागाचे मंत्रिपद भूषविले. कराड तालुक्यात विधानसभेवर मिळालेले हे पहिले मंत्रिपद होते, हा कराडचा सन्मान होता.
सातारा जिल्हा व उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, भारतीय ऑलिम्पिक संघटना, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन अशा अनेक विविध संस्थांवरती नेतृत्व करून खेळाचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये त्यांचा बहुमूल्य वाटा आहे.
स्वातंत्र्याच्या काळात अतिशय तरुण वयात त्यांनी स्वतःला देश कार्यासाठी वाहून घेतले होते. तळबीड एमआयडीसीचे स्वप्न उराशी बाळगून कराडच्या प्रीतिसंगमावर उद्योगाचा वारसा निर्माण करण्यात त्यांनी धन्यता मानली.
शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बालेवाडी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत यशस्वीरित्या उभा केले. सुरुवातीपासून पुरोगामी लोकशाही दल ते राष्ट्रवादी काँग्रेस हा त्यांचा प्रवास हा शरद पवार यांच्या सोबत एकनिष्ठतेने राहिला.