सह्याद्री पर्वत रांगेत वनसंपदेची राख

मारुल हवेली, विहे आणि उरूल विभागातील डोंगर काळेकुट्ट
Satara News |
मारूल हवेली : विहे घाटातील डोंगर होरपळून काळाकुट्ट पडला आहे. वनव्यात मोठी झाडे जळून जात आहेत.Pudhari Photo
Published on
Updated on
धनंजय जगताप

मारूल हवेली : वनविभाग जनजागृती करत असूनही सह्याद्रीच्या रांगेत असलेल्या डोंगरांना आग लावून जीवजंतूसह कोट्यवधी रुपयांच्या वनसंपत्तीची राखरांगोळी केली जात आहे. काही अज्ञातांकडून आगी लावण्याचे प्रकार होत असल्याने वनसंपत्तीचा वर्षानुवर्षे र्‍हास सुरूच आहे. आठ दिवसांपासून ऐन चैत्र महिन्याच्या तोंडावर मारुल हवेली, विहे, उरूल भागासह पाटण तालुक्यातील अनेक डोंगर होरपळून काळाकुट्ट पडल्याचे चित्र दिसत आहे.

पाटण तालुक्यातील विविध भागातील डोंगरांना आग लावण्याचे सत्र यावर्षीही कायम आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळा सुरू होण्याच्या तोंडावर डोंगर पेटविण्याच्या प्रकारात वाढ होत असते. तर प्रत्येक वर्षी पावसाळ्यात वनविभागामार्फत हजारो रुपये खर्च करून डोंगर पट्ट्यात वृक्षारोपण करण्याचे काम केले जात आहे. मात्र याबाबत आजपर्यंत वनविभाग वा कोणत्याही संस्थेने ग्रामीण भागातील वाड्यावस्तीवर असणार्‍या लोकांमध्ये जनजागृती केली नाही. लोकांची अशी धारणा आहे की डोंगर पेटविल्यानंतर पुढील वर्षी आपल्या जनावरांना चांगल्या प्रमाणे व जादा चारा उपलब्ध होतो.त्यामुळे अशा प्रकारचे डोंगर पेटविण्याचे प्रकार होत असल्याचे वयोवृद्ध ग्रामस्थांनी सांगितले. चैत्र पालवी फुटण्याच्या तोंडावर हिरवेगार दिसणारे डोंगर वणव्यामुळे काळेकट्ट दिसत आहेत. या आगीत कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने केलेली वृक्ष लागवड जळून खाक होत आहे. त्याच बरोबर लहान-मोठे लाखो प्राणीमात्रही जळून नाहीसे होत आहेत. शासनाने वृक्ष संवर्धनासाठी खर्च केलेले लाखो रूपये वाया जात आहेत.

दरवर्षी प्रमाणे डोंगरांना वणवा लागण्याचे प्रकार यावर्षीही कायम असल्याने वनसंपत्तीची वाढ होणार का? ही नेहमीचीच समस्या पुढे कायम राहणार अशी प्रतिक्रिया वनप्रेमीकडून होत आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे देशातील वनसंपत्तीत वाढ व्हावी व वन संवर्धन व्हावे यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर कोट्यावधी रूपये खर्च करून प्रयत्न केले जात आहेत. मात्र त्यास काही अज्ञानी व अज्ञात लोकांच्याकडून तिलांजली मिळत आहे. वन संरक्षणासाठी वन विभाग सक्रिय आहे, मात्र गेल्या आठ-पंधरा दिवसांपासून डोंगर रांगांतील भागात वणवा लागण्याचे प्रमाण वाढल्याचे चित्र दिसत आहे. डोंगरात रात्रीच्या वेळी आगी लावल्या जात आहेत. प्रत्येक वर्षी शासनाकडून वृक्ष संवर्धनासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. विविध जंगली झाडे लावून त्याची निगा राखली जाते. मात्र अशा प्रकारे प्रत्येक वर्षी लावलेल्या वणव्याने झाडे जळून खाक होत असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांची राखरांगोळी होत आहे.

वनविभागाच्या वनक्षेत्राला लागून अनेक शेतकर्‍यांच्या शेतजमिनी आहेत. काही जमिनी आजही कसल्या जात आहेत. तर पडीक जमिनींमध्ये पाळीव जनावरांच्या चार्‍यासाठी गवत घेतले जाते. जानेवारी अखेर डोंगरी भागातील गवत काढणी पूर्ण होऊन शिवार मोकळा केला जातो. काही वेळेस शेतामध्ये पडलेला पालापाचोळा, बांधावरील गवताचे बुडके जाळले जातात. मात्र शेतकर्‍यांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे वनक्षेत्रात आगी लागल्या जात आहेत. तसेच काही अज्ञात व्यक्तीही पुढील वर्षी मुबलक चारा व्हावा या अडाणीपणातील गैरसमजूतीमुळे आगी लावण्याचे प्रकार होत आहेत. यात वनसंपत्तीबरोरबच लाखो जीवजंतू मरण पावत आहेत याबाबत शासनामार्फत गावोगावी प्रबोधन करण्याची गरज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news