

कराड : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर 30 लाख कोटींचे करार झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्याबाबत विचारले असता ते पत्रकारांशी बोलत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, केवळ मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य केंव्हातरी बाहेर येतेच. मागील दावोस दौऱ्यातील करार पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे.
आपल्याच राज्यातील कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. ते म्हणतात की आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी करार करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अदाणी आणि लोढा यांच्यासारख्या स्थानिक कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे.