

सातारा : आषाढ संपताच श्रावण सुरु होणार असून मांसाहार वर्ज्य होणार आहे. बुधवार व गुरुवार अशी विभागून गटारी अमावस्या आली आहे. बुधवारीच गटारी साजरी करण्यात आली. मागील दोन दिवसांपासूनच मांसाहारावर ताव मारला जात असल्याने खवैय्यांची चंगळ झाली. त्यामुळे बुधवारी गटारीला शेकडो किलो चिकन-मटणाचा फडशा पडला. खवैय्यांनी माशांवरही ताव मारल्याने चिकन-मटण, मच्छी मार्केटमध्ये लाखोंची उलाढाल झाली.
आषाढी अमावस्येनंतर श्रावण मासारंभ होणार आहे. श्रावणात व्रत-वैकल्यांमुळे अनेक कुटुंबांमध्ये श्रावणात मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे गटारीला यथेच्छ मांसाहार करण्याची प्रथा रुढ झाली आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या ही गटारी अमावस्या म्हणून साजरी केली जात आहे. यावर्षी आषाढी अमावस्या बुधवार व गुरुवार अशी दोन दिवसांमध्ये विभागून आल्याने खवैय्यांचा थोडा हिरमोड झाला. गुरुवारपासूनच श्रावण पाळला जाणार आहे. त्यामुळे मागील दोन दिवस गटारीचे बेत आखून मांसाहारावर ताव मारण्यात आला.
बुधवारीदेखील मांसाहारी खवैय्यांकडून शेकडो किलो चिकन-मटणाचा फडशा पाडण्यात आला. सातारा शहर व परिसरासह ग्रामीण भागातही मटण व चिकन विक्रेत्यांच्या दुकानांबाहेर नागरिकांची गर्दी कायम होती. काहींनी मागील काही दिवसांपासूनच मांसाहारावर जोर दिला आहे. अशा खवैय्यांकडून चवीत बदल म्हणून माशांवर ताव मारुन जीभेचे चोचले पुरवण्यात आले. आखाडीमुळे गेल्या काही दिवसांपासूनच सातारा शहरासह जिल्ह्यातील बहुतांश हॉटेल व धाब्यांवर ग्राहकांची वर्दळ वाढली होती. गटारीनिमित्त हॉटेल, ढाब्यांवर स्पेशल ऑफरही दिल्या होत्या.
आषाढी अमावस्या दिव्यांची अमावस्या म्हणूनही साजरी केली जाते. घरातील सर्व दिवे उजळून त्यांचे पूजन केले जाते. आमावस्येला बुधवारी प्रारंभ झाला असला तरी दीप पूजन गुरुवारी केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दीप पुजनाची तयारीसाठी महिला वर्गाची लगबग सुरु होती. घरातील ठेवणीतील तसेच वापरातील जुने तांब्या-पितळेचे दीप, पणत्या लख्ख घासून पुसून ठेवले जात असून गुरुवारी घरोघरी विधीवत दीप उजळले जाणार आहेत.
आषाढी अमावस्येनंतर श्रावण महिना सुरु होणार असल्याने अनेकजण मांसाहार वर्ज्य करणार आहेत. या पार्श्वभूमीवर गटारीला यथेच्छ ताव मारला. मांसाहारी जेवणाबरोबर शेकडो लिटर मद्य रिचवण्यात आले. अति मद्यपानामुळे काहींचे भान हरपल्यामुळे माकडचाळ्यांनी अनेकांचे मनोरंजन केले. कोणाला परतीचा रस्ता तर कोणाला स्वत:च्या वाहनांची ओळख पटत नव्हती. उघडीप दिलेल्या पावसानेही हजेरी लावल्याने या गोंधळात आणखीच भर पडली होती. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मदिरा अन् मद्यपींच्या करामतींच्या चर्चांना उधाण आले होते.