

कराड : कराडसह पाटण तालुक्यातील चाफळ विभागात जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट बनला असून यावर्षी ज्वारीचा कडबा व गवताचे दर गगनाला भिडल्याने पशू पालक बळीराजाचे बजेट कोलमडले आहे. सध्या ज्वारीच्या कडब्याचा दर तीन हजाराहून अधिक झाला आहे. तर गवताचा दर एक हजार शेकडा झाला आहे. एवढे दर होऊनही चारा मिळत नसल्याने बळीराजा अडचणीत सापडला आहे.
दोन्ही तालुक्यातील शेतकरी वर्ग शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात पशुपालन करताना दिसत आहेत. त्यातच दुधाला ही चांगल्या प्रकारे भाव मिळत आहे. त्यामुळे जवळपास सर्वच शेतकरी किमान दोन ते चार जनावरे पाळून आहेत. ऊस तोड सुरू होती, तोपर्यंत वैरण विकत आणून कशी तरी चार्याची सोय होती.
मात्र यावर्षी ऊस तोडणी लवकर संपल्याने ती वैरण मिळाली नाही. यावर्षी ज्वारीच्या उत्पादनात काही प्रमाणात घट झाल्याने ज्वारीच्या कडब्याचं प्रमाणात अत्यल्प आहे. तर हायब्रीडचे पीक घेणं बहुतेक शेतकर्यांनी बंद केले आहे. त्यामुळे हायब्रीडचा कडबा नजरेसही पडत नाही. तर डोंगर माथ्यावरील वनवासवाडी, कोळेकरवाडी, भैरेवाडी, गणेवाडी, सडा-दाढोली, महाबळवाडी, गुजरवाडी या गावांसह डोंगराशेजारी असणार्या शेत जमिनीत डुकरांनी हैदोस घातला असून हातातोंडाशी आलेल्या पिकांचा फडशा पाडत आहेत. निसर्गाच्या लहरीपणाचा नेहमीच बळी ठरणारा येथील बळीराजा चोहोबाजूंनी संकटे उभी ठाकल्याने सगळा भरवसा दैवावर टाकत मिळेल त्या उत्पन्नावर आपला संसाराचा गाढा हाकत आहे.
अगोदरच बिबट्याकडून पाळीव प्राण्यांवर सततचे होणारे हल्ले शेतकर्यांच्या मुळावर उठले आहेत. दोन्ही तालुक्यातील डाेंंगरी विभागातील बहुंताश शेतकरी शेळी पालन व इतर पाळीव जनावरे पाळून आपली उपजिवीका चालवत आहेत. अशात या वन्य प्राण्यांकडून सतत हल्ले होऊ लागल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. त्यातच आता जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट झाला आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची मागणी येथील शेतकरी करु लागले आहेत.
सध्यस्थितीत दुधाला अपेक्षित दर मिळत नाही. त्यातच चार्यासह वन्य प्राण्यांपासून जनावरांचे रक्षण करणे दिवसेंदिवस अवघड झाले आहे. त्यामुळे जनावरे विकून रोजगार केलेला बरा...अशी म्हणण्याची वेळ आमच्यावर आली असल्याची प्रतिक्रिया शेतकर्यांकडून व्यक्त होताना पहावयास मिळते.