

कराड : जुलैच्या पहिल्या आठवड्यातच कोयना धरण सत्तर टक्क्यांहून अधिक भरले आहे. कोयना धरणांतर्गत कोयना, नवजा, महाबळेश्वर या तिन्ही ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. पाऊस कायम राहिला तर कोयना धरणातून पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे निर्माण होणार्या पूर परिस्थितीच्या अनुषंगाने प्रशासन अलर्ट झाले आहे.
कृष्णा आणि कोयना नदीकाठावर शेकडो गावे वसली आहेत. त्यापैकी 77 गावांना प्रत्येकवेळी पुराचा फटका बसतो. मात्र, वारंवार घोषणा होऊनही या गावांमध्ये सुरक्षेच्या उपाययोजना झालेल्या नाहीत. कराड आणि पाटण तालुक्यातील नदीकाठावर वसलेल्या अनेक गावांना पुराचा फटका बसतो.
कराड तालुक्यात पूर परिस्थितीत संपर्क तुटणारी गावे कोयना नदीकाठावरील तांबवे, कृष्णा नदी काठावरील आटके, जाधवमळा, दुशेरे, तसेच वांग नदीकाठावरील आणे ही गावे आहेत. नदीकाठावरील ज्या गावांना पुराचा धोका निर्माण होतो त्या गावांमध्ये कोयना नदीकाठी 13 गावे आहेत. कृष्णा नदीकाठी 39, तारळी नदीकाठी 6, उत्तर मांड नदीकाठी 6, दक्षिण मांड नदीकाठी 8 वांग नदीकाठी 4 अशी 77 गावे आहेत. या गावांना पूर काळात धोका निर्माण होत असतो. त्यामुळे प्रशासन अलर्ट झाले आहे.
कराड, पाटण तालुक्यातील 77 गावांना पुराचा सामना करावा लागतो. यंदाही संबंधित गावांना पूर परिस्थितीला तोंड द्यावे लागणार आहे. प्रशासनाकडून संरक्षणाच्या ठोस उपाययोजना राबवल्या जाण्याची गरज आहे. अनेक कुटुंबांच्या पुनर्वसनासह नदीकाठावरील अतिक्रमणाचा प्रश्नही अद्याप कायम आहे. धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने धरणातून पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून निर्माण होणार्या पूर परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.
कृष्णा नदी : कराड शहर, गोटे, कापील, आटके, जाधव मळा, सयापूर, पाचवड वस्ती, गोळेश्वर, मालखेड, रेठरे खुर्द, दुशेरे, वाठार, रेठरे बुद्रुक, कार्वे, कोडोली, पवार मळी, खुबी, गोंदी, खोडशी
कोयना नदी : वारुंजी, तांबवे, म्होप्रे, येरवळे, चचेगाव, पोतले, साजूर
पाटण तालुका
कोयना नदी : हेळवाक, पाटण, निसरे, मंद्रूळ हवेली, नावडी, मुळगाव, सागाव