Satara Flood News | महापूर आला धावून... सर्वस्वच गेलं वाहून!

डागडुजींचे अपवाद वगळता अपेक्षित बदल पाहायला मिळालेच नाहीत
Satara Flood News |
पाटण : चार वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टी, महापूर, भूस्खलनात तालुक्यातील सार्वजनिक व्यवस्था अशाप्रकारे उद्ध्वस्त झाली. (संग्रहित छायाचित्र)File Photo
Published on
Updated on
गणेशचंद्र पिसाळ

पाटण : 21 जुलै 2021 ला झालेल्या ढगफुटी, भूस्खलन, महापूर या नैसर्गिक आपत्तीत पाटण तालुक्यातील अनेक गावं, कुटुंब, मुलबाळं, वर्षानुवर्षे उभा केलेला संसार दुभत्या जनावरांसह गाडला गेला. वैयक्तिक हानी झालीच. शिवाय तालुक्यातील सार्वजनिक रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना, हजारो एकर शेती, शाळा, समाज मंदिरे ते अगदी स्मशानभूमीही उद्ध्वस्त झाल्या. चार वर्षांनंतरही याच व्यवस्थेला टक्केवारीच्या विकासाची तात्पुरती मलमपट्टी, डागडुजींचे अपवाद वगळता अपेक्षित बदल पाहायला मिळालेच नाहीत.

‘ये गं ये गं सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून’ अशा बाल कविता त्या काळात मनाला वेगळाच आनंद, उत्साह आणि ऊर्जा द्यायच्या. पण हाच निसर्ग तथा पाऊस ज्यावेळी सर्वसामान्यांच्या मुळावर उठून ढगफुटी, अतिवृष्टी, भूस्खलन, महापुरातून माणसांसोबतच राहाती घरं, वर्षानुवर्षे जोडलेला संसार, शेतातील पिकांसह शेतजमिनीही अक्षरशः जमिनीत गाडतो किंवा वाहून नेतो त्यावेळी मग याला काय म्हणायचे? हा कोप नैसर्गिक की मानवी याहीपेक्षा यात झालेली जीवित व वित्त हानी ही अतिशय दुःखदायी ठरली.

ज्या अंगणात छोट्याशा डबक्यात लहानपणी कागदाच्या बोटी करून मनमुराद आनंद घेतला त्या अंगणातच महापुरामुळे शासनाच्या बोटी आल्या. गळ्यापर्यंत पाणी आणि त्यातून जीव वाचण्यासाठी अंगावरच्या कपड्यांसह भरला संसार जागेवरच ठेवून बाहेर पडावं लागलं. आयुष्यभर पै-पै गोळा करून उभा केलेला संसार एका क्षणात मातीत गाडला गेला. ज्या बालकांनी पहिला वाढदिवसही पाहिला नाही त्यांच्यावर पुण्यस्मरणाची वेळ आली. असे दुःखद विधी करायला काही कुटुंबात कोणीही शिल्लक राहिलं नाही. ज्या वास्तूंनी ऊन, वारा, पावसात सावली व निवारा देत आपलं रक्षण केलं, त्याच वास्तूंना या प्रकोपात कुटुंबीयांसोबतच स्वतःलाही गाडून घ्याव लागलं. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक हानी झाली, त्याचवेळी दुसरीकडे सार्वजनिक मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

प्रामुख्याने हजारो एकर शेती वाहून गेल्याने व जमिनीत मोठे दगड, वाळू, गोटे आल्याने ते बाजूला काढण्याचा खर्चही परवडणारा नसल्याने संबंधितांना त्या जमिनी पाडून ठेवण्याशिवाय पर्यायच उरला नाही. अनेक गावांतील रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. अनेक गावांना जोडणारे छोटे-मोठे पूल, फरशा, मोर्‍या, साकव वाहून गेले. पिण्याच्या पाण्याच्या योजना भुईसपाट झाल्या. अनेक प्राथमिक शाळा, विद्यालयेही या आपत्तीत जमीनदोस्त झाली. शासनाचा तुटपुंजा निधी व तात्पुरती मलमपट्टी म्हणजे आभाळाला ठिगळं घातल्यासारखे आहे. यासाठी आवश्यक उपाययोजना गरजेच्या आहेत. चार वर्षांपूर्वी झालेल्या या अभूतपूर्व नुकसानीची भरपाई कधी आणि कशी होणार आणि त्या कुटुंबांना कधी न्याय मिळणार हाच प्रश्न अनुत्तरीत आहे.

ठेकेदारी, टक्केवारीसाठी निकृष्ट कामे...

तालुक्यात नैसर्गिक आपत्ती स्थानिकांना उद्ध्वस्त करत असली तरीठेकेदारी व टक्केवारीसाठी हीच आपत्ती येथे इष्टापत्ती ठरते. पावसाळ्यात काम केल्याचे दाखवून उन्हाळ्यात ते धुऊन गेल्याची कागदोपत्री घोडी नाचवायची आणि दरवर्षी पुन्हा त्याच त्या कामांची साखळी निर्माण करायची असे प्रकार पाहायला मिळत आहेत. टक्केवारीतून दर्जाहीन कामांमुळे सार्वत्रिक व्यवस्थाच उद्ध्वस्त झाली आहे. याकडे सत्ताधारी, विरोधक जाणीवपूर्वक कानाडोळा करतात, असे आरोप होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news