

सातारा : सातारा शहरात दुचाकी चोरी करणार्या दोघांकडून पोलिसांनी 5 दुचाकी जप्त केल्या. यामध्ये सातारा शहर पोलिसांनी एका चोरट्याकडून 4 तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून 1 अशा दुचाकी जप्त केल्या आहेत.
शहर पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव प्रल्हाद रमेश पवार (वय 22, रा. केसरकर पेठ, सातारा) व एलसीबीने पकडलेल्या शंकर नंदकुमार कदम (वय 38, रा.गुरुवार पेठ, सातारा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरात दुचाकी चोरी करणार्या चोरट्यांनी धुडगूस घातला होता. पोलिस त्यानुसार चोरट्यांचा शोध घेत होते. पोलिस गस्त घालत असताना शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाला (डीबी) रेकॉर्डवरील प्रल्हाद पवार हा संशयित दुचाकीवर दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून दुचाकीच्या मालकीबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले.
तसेच आणखी 3 दुचाकी चोरी केल्याचीही कबुली दिली. दरम्यान, एलसीबी पोलिसही गस्त घालत असताना संशयित शंकर कदम याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त करुन त्याला अटक केली. पोनि राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शाम काळे, फौजदार सुधीर मोरे, पोलिस निलेेश यादव, सुजीत भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, तानाजी भोंडवे, इरफान मुलाणी, तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे यांनी कारवाईत सहभाग घेतला.