

सातारा : करंजेतील आंदेकर चौक व मंगळवार पेठेतील मांढरे आळी येथे झालेल्या वृषभ जाधव याच्या मर्डर प्रकरणी आप्पा मांढरे, नगरसेवक रवी ढोणे याच्यासह 11 जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी 5 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता 28 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
धनराज मांढरे, संकेत मांढरे, अक्षय मांढरे, अर्जुन साळुंखे, हैदरअली सय्यद, अतिक शेख, ओंकार कापसे, योगेश चोरगे, दीपक उर्फ आप्पा मांढरे, रवींद्र ढोणे व अनोळखी तिघे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील धनराज दीपक मांढरे (वय 21, रा. चिमणपुरा पेठ), अर्जुन रामदास साळुंखे (वय 23, रा. सारखळ, ता. सातारा), हैदरअली रज्जाक सय्यद (वय 20, रा. शनिवार पेठ), अतिक हसन शेख (वय 29, रा. बुधवार नाका), ओंकार राजेश कापसे (वय 19, रा. शाहूपुरी) अशी अटक केलेल्या व पोलिस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. वृषभ जाधव याच्या खूनप्रकरणी त्याचा चुलत भाऊ श्रेयस दशरथ जाधव (वय 20, रा. रविवार पेठ) याने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
तक्रारदार श्रेयस जाधव याने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, 3 वर्षांपूर्वी राजवाडा येथे जुन्या वादाच्या कारणातून आप्पा मांढरेवर गोळीबार झाल्याचा गुन्हा दाखल होता. माझा भाऊ वृषभ जाधव याच्या सांगण्यावरून हा गोळीबार केला असल्याचा संशय आप्पा मांढरे यांना होता. त्यामुळे आमचे एकमेकांशी पटत नव्हते. दि. 10 ते 12 जानेवारी या दोन दिवसांत योगेश चोरगे याने मला वारंवार फोन केले होते. त्यानुसार दोन ठिकाणी मला बोलावून घेत त्याने वृषभला समजावून सांग. धीरज ढाणे याच्यासोबत फिरू नको. रवी ढोणे सोबत त्याचे भांडण आहे. आप्पाच्या गँगमध्ये काम करा, नाहीतर आप्पा साताऱ्याचा डॉन आहे. रवी ढोणे व आप्पा मांढरे यांच्या सोबत मिळून आम्ही वृषभला मारून टाकू, अशी धमकी दिली होती.
दि. 22 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता वृषभ हा आंदेकर चौकात थांबला होता. त्यावेळी संशयितांनी वृषभ याच्यावर कोयत्याने हल्ला केला. वृषभ याला जखमी करून संशयित आरोपींनी वृषभला जखमी अवस्थेत दुचाकीवर बसवून आप्पा मांढरे यांच्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नेवून पुन्हा हल्ला केला. दवाखान्यात जावून पाहिले असता वृषभ याच्या पायावर, हातावर, डोक्यासह इतर ठिकाणी वार झालेले होते. श्रेयस जाधव याच्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी युध्दातूनच हा खून झाल्यामुळे पोलिसांनी कसून तपासाला सुरूवात केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी धरपकड करत 5 जणांना अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली.