Farmers crisis: शेतकरी म्हणतात, वाढत्या खर्चामुळे शेती परवडेना

खत दरवाढ, मजुरांची टंचाई, बदलत्या हवामानामुळे शेती संकटात; शेती गुंठेवारीने उत्पादनात घट
Farmers crisis
Farmers crisisFile
Published on
Updated on
अशोक मोहने

कराड : शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खतांचे वाढते दर, शेतमजुरांची टंचाई, वन्यप्राण्यांकडून होणारे नुकसान आणि बदलते हवामान या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम शेतीवर होत आहे. वाढत्या खर्चाने शेती परवडेना असा चिंतेचा सूर शेतकऱ्यांमध्ये आहे.

गेल्या काही वर्षांत शेतीसाठी लागणाऱ्या खतांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. 2021 पासून सुरू झालेली दरवाढ अद्याप थांबलेली नसून उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. खते ही शेतीसाठी अत्यावश्यक बाब बनली असली तरी वाढते दर शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे राहिलेले नाहीत.

दुसरीकडे, ग्रामीण भागातील तरुणांचे शहरांकडे स्थलांतर वाढल्याने शेतमजुरांची कमतरता भासत आहे. उपलब्ध मजुरांकडूनही अधिक मजुरीची मागणी होत असून ऐन हंगामात शेतकऱ्यांची अडचण वाढत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी मशागतीसाठी यंत्रांचा वापर करत असले तरी इंधन दरवाढीमुळे त्याचा खर्चही वाढला आहे.

वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव ही आणखी एक गंभीर समस्या बनली आहे. रानडुक्कर, रानगवे, मोर यांसारख्या प्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांवर हल्ल्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे अनेकांनी शेती पाडून ठेवण्याचा मार्ग स्वीकारला आहे. बदलत्या हवामानामुळेही शेतीचे गणित कोलमडले आहे.

अनियमित पाऊस, दुष्काळ आणि वाढते तापमान यामुळे उत्पादन घटत आहे.याशिवाय पाणीपुरवठ्याचा वाढता खर्च, विजदर आणि देखभाल खर्चामुळे पाणीपट्टी शेतकऱ्यांना डोईजड ठरत आहे. या सर्व घटकांमुळे शेतीचा एकूण खर्च वाढून शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले आहे. शेती टिकवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज शेतकरी व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news