

खेड : धोम धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकर्यांना मंजुर व हक्काचे पाणी वेळच्या वेळी व पूर्ण क्षमतेने मिळावे, यासाठी कार्यरत असलेल्या धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने धोम धरण परिक्रमा आणि जलपूजन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यामध्ये वाई, जावली, सातारा व कोरेगावातील शेतकरी सहभागी झाले होते.
यावेळी धोम धरणाच्या काठावर झालेल्या शेतकर्यांच्या सभेत धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष सी.आर. बर्गे यांनी येत्या दोन वर्षांत धोम धरणाच्या डाव्या कालव्याचे संपूर्ण अस्तरीकरण करून घेण्यासाठी समिती शासनाकडे पाठपुरावा करत असून हे काम लवकरच पूर्णत्वास जाईल तसेच कालव्याच्या वरील भागातील शेतकर्यांनी कालव्याच्या टेलचे भिजवन पूर्ण करुन घेण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. समितीचे सचिव नंदकुमार पाटील यांनी शाश्वत पाण्यासाठी कालवा पाणी वापर सहकारी संस्था स्थापन करून त्या चालविणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
समितीचे कार्याध्यक्ष रणजित फाळके यांनी मागील वर्षात धोम धरणाच्या पाणी वाटपासंबधी कराव्या लागलेल्या आंदोलनाचे यशापयश विषद केले. धोम धरण कार्यान्वित झाल्यापासून कालव्यांची सफाई झाली नव्हती,आता धोमच्या डाव्या व उजव्या कालव्याची 13 मशिन यंत्राद्वारे सफाई सुरू झाली आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी कोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, सुरेश जगदाळे, कॅप्टन महादेव भोसले, जीवन शिर्के, विनायक साळुंखे, संजय शेलार, धीरज माने यांनी संघर्ष समितीच्या कामाचे कौतुक करून राजकारण व गट- तट बाजूला ठेवून शेतकर्यांच्या हक्काचे पाणी मिळवू आणि वाढवू या, असे आवाहन केले. याप्रसंगी वाई, जावली, सातारा व कोरेगाव तालुक्यातील उपस्थित शेतकर्यांनी धोम धरणाच्या काठावर जाऊन जलपूजन केले.
कुमठेकरांनी केला समितीच्या पदाधिकार्यांचा सत्कार
वाई, जावली सातारा व कोरेगाव तालुक्यातील शेतकर्यांना धोम धरणातील मंजूर व हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समिती सातत्याने लढा देत शेतकर्यांना न्याय मिळवून देत आहे. या भागातील सकल शेतकर्यांना आधार ठरलेल्या समितीच्या पदाधिकार्यांचा कर्तव्य भावनेतून यावेळी कुमठे ग्रामस्थांनी सत्कार केला.