

कराड : विधानसभा निवडणूक काळात देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकर्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन दिले होते. पावसामुळे खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे महायुती सरकारने शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची तयारी सुरू केली असून याचा पहिला टप्पा म्हणून पुणे साखर आयुक्तांना निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, उसाचा दुसरा हप्ता 500 रुपये द्या, यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. त्यावेळी बळीराजा शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी आक्रमक होऊन आपल्या व्यथा शासन दरबारी मांडत होते. मागण्या मान्य न झाल्यास बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा गंभीर इशारा देण्यात आला.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विश्वास जाधव, चंद्रकांत यादव सातारा जिल्हाध्यक्ष, गणेश शेवाळे युवा प्रदेशाध्यक्ष, डॉ. उन्मेश देशमुख सांगली जिल्हा अध्यक्ष, महेश जिरंगे रासप कार्याध्यक्ष, सुनील कोळी, दीपक पाटील, रवी लिंबारे, मनोज हुबाले, दिगंबर जगताप यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. साखर आयुक्त डॉ.चंद्रकांत पुंडलवार यांना निवेदन देण्यात आले.
कराड, पाटण तालुक्यात लहान मोठी धरणे आहेत. कोयना धरण वगळता अन्य धराणांचे गेट अधिकारी वेळनुसान उघडत नाहीत. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते. पाणी वाढल्यानंतर धरणांचे गेट वेळोवळी उघडण्यात यावे या मागणीसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथे सिंचन विभाग कार्यालयासमोर बळीराजा संघटने धरणे आंदोलन केले.