

पाटण : मेंढेघर (कदमवाडी, ता. पाटण) येथे गुरुवारी वादळी वार्यामुळे जमिनीवर तुटून पडलेल्या वीज वाहक तारेला स्पर्श झाल्याने शेतकरी मोहन अंबाजी कदम (वय 45) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर कुटुंबास तातडीची आर्थिक मदत दिल्यानंतर मोहन कदम यांचा मृत्यदेह शवविच्छेदनास पाठविण्यात आला.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोयना विभागातील मेंढेघर (कदमवाडी) येथील शेतकरी मोहन अंबाजी कदम हे गुरुवार, 24 जुलैला सकाळी जनावरे चरण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी जनावरे घरी परतली. मात्र मोहन कदम हे घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्यांची शोधाशोध केली. त्यावेळी शेताच्या माळरानावर त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच ठिकाणी शेजारी वीज वाहक तार तुटून जमिनीवर पडली होती. या तारेला स्पर्श झाल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळेच हा प्रकार घडला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. कदम कुटूंब गरीब असल्याने त्या कुटुंबास आर्थिक मदत द्यावी, अन्यथा मृतदेह हलविणार नाही असा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. तसेच या मागणीसाठी ग्रामस्थांनी ठिय्या मारला होता. यामुळे काहीकाळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या कालावधीत वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांसोबत चर्चा सुरू होती. या चर्चेमुळे तोडगा निघण्यास मदत झाली. त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी कदम कुटूंबियांना तातडीची 20 हजार रुपयांची मदत दिली. तसेच उर्वरित मदत पंचनामा करून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर देण्यात येईल, असे लेखी पत्र वीज कंपनीच्या अधिकार्यांनी ग्रामस्थांना दिले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर कदम यांचा मृतदेह पाटण येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला. रात्री उशिरा शवविच्छेदन केल्यानंतर मेंढेघर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.