

फलटण : तालुक्याचे मुख्य केंद्र असलेले फलटण शहर विकासाच्या गप्पा रंगवते पण प्रत्यक्षात मूलभूत सोयी सुविधांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी, अतिक्रमणे, मोकाट जनावरे, भटकी कुत्री, अस्वच्छता, तुंबलेली गटारे, मुतार्या व शौचालयांचा अभाव या सर्व समस्यांनी शहरवासीय वैतागले आहेत. या समस्यांचा डोंगर फोडून फलटणकरांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्याचे आव्हान नूतन मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या समोर आहे.
फलटण शहराच्या विकासाचा योजनाबद्ध आराखडा नसल्याने शहरांमध्ये दिवसेंदिवस समस्यांची वाढ होत आहे. निधी येतो किती? तो खर्च होतो कसा? नियोजनबद्ध कामे केली जातात का? यासह अनेक प्रश्न फलटणकरांच्या मनामध्ये आहेत. विकास कामाबाबत फलटणची जनता हवी तेवढी जागरूकता दाखवत नाही. त्यामुळे फलटणचा विकास रेंगाळला आहे. दैनंदिन जीवन जगत असताना आवश्यक असणार्या रस्त्यांची आवश्यक सुविधा शहरामध्ये अजिबात दिसून येत नाही. शहरातील इतर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांचा रस्ता आहे.
नेमकं कोणतं नाव द्यावं हा प्रश्न पडतो. खड्डेमय रस्त्यांचा नागरिकांना रोज सामना करावा लागत आहे. प्रमुख रस्त्यावरच नव्हे तर गल्लीबोळामधील रस्ते प्रचंड खड्डेमय झाले आहेत. खड्ड्यामुळे वाहनचालकांचे हाल होत आहेत. हे खड्डे अपघाताला निमंत्रण देतात. रस्ते सुधारण्याची खड्डे भरण्याच्या नागरिकांच्या मागणीला कायमच वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात आहेत.
वाहतूक कोंडीचा प्रश्न हा शहरवासीयांसाठी जटिल बनला आहे. पृथ्वी चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक, जिंती नाका हे वाहतूक कोंडीचे हॉटस्पॉट बनले आहेत. वाहतूक कोंडी बरोबरच शहरांमध्ये पार्किंग व्यवस्था कुठेही नसल्याने रस्त्यावर वाहनांची गर्दी होते. रिंगरोड हा रोड बहुतांश ठिकाणी पार्किंग रोड झाला आहे. सातत्याने वाहतूक पोलिसांची गरज असताना त्या बाबतीत योग्य नियोजन नसल्याने वाहतूक कोंडी वाढून नागरिकांचा वेळही वाया जातो. पार्किंगबाबत नगरपालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाची प्रचंड उदासीनता दिसून येते. शहरामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण व अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट झाला आहे. रस्ते, फुटपाथ, सार्वजनिक जागा अतिक्रमणाने व्यापल्या आहेत. नाले आक्रसले आहेत.
वाढत्या अनधिकृत बांधकामामुळे शहरी नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. अनेक ठिकाणी कचर्याची व गटाराची समस्या आरोग्यास धोका निर्माण करणारी आहे. नियमितपणे कचरा गाड्या येत असल्या तरी शहरातील अनेक ठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो. रस्त्याच्याकडेने कचर्याचे ढीग नजरेस पडतात. ठिकठिकाणी गटारे तुंबून दुर्गंधी व डासाचा उपद्रवही वाढत आहे. शहरामध्ये सार्वजनिक मुतार्या व शौचालयांची सुविधा अत्यंत अपुरी असल्याने गैरसोय होते.
विशेषत: या सुविधा नसल्यामुळे महिलांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मोकाट जनावरांमुळे अपघातांचा धोका निर्माण होतो. तर भटक्या कुत्र्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भटकी जनावरे मोकाट कुत्र्यांमुळे रस्त्यावर अस्वच्छता वाढत आहे. शालेय मुलं वृद्ध व्यक्तीं भटकी कुत्री दिसताच भयभीत होत आहेत.
पाच राज्यात किती महिलांना उमेदवारी
फलटण शहरातील सर्व समस्या गंभीर असून त्याकडे तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिक कर भरतात परंतु त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत ही मोठी शोकांतिका आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाही तर नागरिकांचा रोष वाढतच राहणार आहे. त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फलटणचे नूतन मुख्याधिकारी यांनी पाचगणीचे नाव राज्यभर चांगल्या कामाने मोठे केले आहे. पाचगणीप्रमाणेच चांगले काम करून फलटणचा नावलौकीक वाढवण्याबरोबर फलटणकरांच्या समस्या सोडवण्याच्या परीक्षेत निखिल जाधव विशेष श्रेणीसह यशस्वी होणार का? याचे उत्तर आगामी काळात मिळेल.