Jaykumar Gore | महाभारताप्रमाणे फलटणमध्येही ‌‘शकुनी मामा‌’ : ना. जयकुमार गोरे

षड्‌‍यंत्र करणाऱ्यांचा काळ मोठा नसतो
Jaykumar Gore | महाभारताप्रमाणे फलटणमध्येही ‌‘शकुनी मामा‌’ : ना. जयकुमार गोरे
Published on
Updated on

साखरवाडी/तरडगाव : जसे महाभारतात शकुनी होते. तसेच फलटणमध्येही एक ‌‘शकुनी मामा‌’ आहे. कालसुद्धा एका घटनेत रणजितदादांचा काही संबंध नसताना मीडियामागे लावली गेली. पण षड्‌‍यंत्र करणाऱ्यांचा काळ फार मोठा नसतो. फलटण तालुक्याच्या इतिहासात सर्वाधिक विकासकामे करणारे नेते म्हणजे रणजितसिंह नाईक-निंबाळकर आहेत. आजचा जो दिवस उजाडला आहे, त्यासाठी फलटणकरांना वीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि त्या संघर्षाचा पाया रणजितदादांनी रचला. पराभवानंतरही त्यांनी हार मानली नाही. विधानसभेचा विजय अशक्य मानला गेला, पण त्यांनी तो शक्य करून दाखवला, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणावर फलटण तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त आयोजित सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, आ. राहुल कुल, आ. महेश शिंदे, आ. अतुल भोसले, आ. मनोज घोरपडे, माजी आमदार राम सातपुते, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, जिजामाला नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, विक्रमसिंह भोसले, जयकुमार शिंदे, दिलीपसिंह भोसले, जलसंपदा विभागाचे अप्पर सचिव दीपक कपूर, कोल्हापूर परिक्षेत्राचे महापरिनिरीक्षक सुनील फुलारी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपस्थित होते.

ना. जयकुमार गोरे म्हणाले, ना. देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांचे खरे भगीरथ आहेत. ते फक्त खटाव-फलटण-सोलापूरच नव्हे तर संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवणारे मुख्यमंत्री आहेत. याआधी अनेक जाणते राजे झाले, पण शेतकऱ्यांचे खरे हित करणारे मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस होय. मी साधा रेशनिंग दुकानदाराचा मुलगा असून आज मंत्री झालो, ते फडणवीस यांच्यामुळेच. देवेंद्रभाऊ, आपण सांगाल तोपर्यंत आम्ही संघर्ष करत राहू. रणजितसिंह माझ्यापेक्षा हुशार आहेत; जर ते खासदार असते तर आज माझ्या जागी तेच मंत्री असते, असेही ना. गोरे म्हणाले.

आ. सचिन पाटील म्हणाले, गेल्या 30 वर्षांमध्ये थांबलेली विकास कामे रणजितसिंह ना. निंबाळकर यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केली. आम्ही दोघे मिळून अतिशय चिकाटीने काम करत आहोत. आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशिर्वाद मिळत आहे. दोन दिवसापूर्वी घडलेल्या डॉक्टर युवती आत्महत्या घटनेमुळे खूप वेदना झाल्या. त्या आरोपींना पकडण्याचं काम दोनच दिवसांमध्ये करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला दबदबा काय असतो ते दाखवून दिले आहे. आरोपीच्या पाठीशी आम्ही नाही. पण या घटनेमध्ये राजकारण आणून काहीजण मढ्याच्या टाळूवरचं लोणीही खात आहेत. आम्ही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो, कधी कुठल्या कार्यकर्त्याचा फोन येतो आणि मग फोन आपण अधिकाऱ्यांना करायचा नाही का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news