Insta Love Story | इन्स्टावरील ‘ती’ लव्ह स्टोरी बनावट; जीव गेला तो मात्र खर्‍याखुर्‍या युवतीचा!

मैत्रिणीच्या रूपातील वैरिणीला अखेर अटक
Insta Love Story
इन्स्टावरील ‘ती’ लव्ह स्टोरी बनावट; जीव गेला तो मात्र खर्‍याखुर्‍या युवतीचा!file photo

पिंपोडे बुद्रुक : दोन मैत्रिणी... दोन्ही उत्तर कोरेगाव परिसरातील अल्याड-पल्याड गावच्या. एकीला लहर आली दुसरीची चेष्टा करण्याची. तिने एका युवकाच्या नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट उघडले आणि या बनावट अकाऊंटवरून पल्याडच्या मैत्रिणीला फे्ंरड रिक्वेस्ट पाठविली. पल्याडच्या मैत्रिणीने ती स्वीकारली. पुढे अल्याडच्या मैत्रिणीची इन्स्टावरील चेष्टा पल्याडच्या मैत्रिणीच्या थेट जीवावर बेतली. पल्याडची मैत्रीण आता काळाच्या पडद्याआड आहे, तर अल्याडची मैत्रीण गजाआड आहे!

चेष्टेला एक नवे कथानक जोडून थ्रिल

मनीषा (वय 23, नाव बदलले आहे) हिने मनीष पाटील या नावाने सुरू केलेल्या इन्स्टा अकाऊंटवर आशा (वय 24, नाव बदलले आहे) हिच्याशी बोलायला सुरुवात केली. लाघवी बोलण्यातून आशाला इम्प्रेस केले आणि आपल्या प्रेमात पाडले. मनीषने आता फोनवर बोलावे, प्रत्यक्ष भेटावे म्हणून आशा जिद्दीला पेटली. मनीष अस्तित्वातच नाही तर बोलणार, भेटणार कुठून? मनीष नावाने अकाऊंट चालविणार्‍या मनीषाने मग आपले पितळ उघडे पडू नये व चेष्टेला एक नवे कथानक जोडून काही तरी थ्रिल करावे म्हणून शिवम पाटील या नावाने दुसरे बनावट खाते तयार केले. मी मनीषचा दुर्दैवी पिता आहे, असे या बनावट शिवमने आशाला कळविले.

Insta Love Story
Love Story : ज्यानं अ‍ॅसिड फेकलं, त्याच्याबरोबरच ‘तिने’ थाटला संसार

मनीष आता या जगात नाही. काही दिवसांपूर्वीच तो मरण पावलाय, असेही या शिवमने आशाला सांगितले. आशा टोकाची निराश झाली. आशाचे हे पहिलेच प्रेम होते. न बोलता, न भेटता प्रियकराशी झालेला विरह तिच्या सहनशीलतेपल्याड गेला आणि पल्याडच्या आशाने गळफास घेतला. आत्महत्या केली. पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

सायबर तज्ज्ञाच्या मदतीने उलगडले आशाच्या आत्महत्येचे रहस्य

आत्महत्येचे कारण शोधून काढण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. सायबर तज्ज्ञ जय गायकवाड यांनी आशाचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला. आशाचे मनीष व शिवम यांच्याशी झालेले चॅट समोर आले. गायकवाड यांनी इन्स्टाग्राम कंपनीकडून अधिक माहितीही मागवली. सखोल तपासाअंती दोन्ही अकाऊंटस् बनावट असल्याचे समोर आले; मग हे बनावट अकाऊंटस् सुरू करण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाईल नंबर ट्रेस केला गेला (शोधला गेला). नंबर मनीषाचा होता. मनीषाने केवळ स्वत:च्या मनोरंजनासाठी आशावर अघोरी नैराश्य लादले... आशाने जीव दिलेला असला तरी एका अर्थाने तो मनीषाने घेतलेलाच आहे. मैत्रीण कसली, ही तर वैरिणच... आशाच्या आत्महत्येची घटना 12 जूनची आहे. घटनेचा उलगडा झाल्यानंतर मनीषा आता पोलिसांच्या कोठडीत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news