Fake Fertilizer: युरियात चुन्याची तर डीएपीत दगड भुकटीची भेसळ; रासायनिक खतांमध्ये बोगसबाजी

ग्रामीण शेतकरी टार्गेट
Fertilizer
FertilizerPudhari
Published on
Updated on

सातारा : जिल्ह्यात प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी आणि संयुक्त खतांमध्ये भेसळ होत असल्याचे बर्‍याचदा निदर्शनास आले आहे. युरियामध्ये चुन्याची पावडर, जिप्सम किंवा साध्या मिठाची भेसळ केली जात आहे.

डीएपीमध्ये दगडाची भुकटी, राख किंवा कमी दर्जाचे फिलर पदार्थ मिसळले जात आहेत. एनपीके व सूक्ष्म अन्नद्रव्य खतांमध्ये निकृष्ट रसायनिक पदार्थ मिसळून शेतकर्‍यांच्या माथी मारली जात आहेत. बोगस खत विक्रीतून उत्पन्न घटत असून शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. रासायनिक खतांची बोगसबाजी रोखण्यासाठी कृषी विभागाने कारवाईची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांतून होत आहे.

जिल्ह्यात रासायनिक खतांमधील भेसळीने डोके वर काढले आहे. कृषी विभागाकडून त्याविरोधात कारवाया होत असल्या तरी ग्रामीण भागात चोरी छुपके भेसळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने युरिया, डीएपी, एमओपी आणि संयुक्त खतांमध्ये भेसळ होत असल्याचे बर्‍याचदा निदर्शनास आले आहे. युरियामध्ये चुन्याची पावडर, जिप्सम किंवा साध्या मिठाची भेसळ केली जाते. या भेसळीत वापरल्या जाणार्‍या घटकांचे कण हे युरियासारखेच दिसतात. त्यामुळे शेतकर्‍यांना ते सहजपणे ओळखता येत नाहीत.

डीएपीमध्ये दगडाची भुकटी, राखेचे मिश्रण किंवा कमी दर्जाचे फिलर पदार्थ मिसळले जातात. त्यामुळे खतातील नत्र व स्फुरदाचे प्रमाण कमी होते. एनपीके व सूक्ष्म अन्नद्रव्य खतांमध्ये निकृष्ट दर्जाचे रसायनिक पदार्थ मिसळून पॅकिंग केले जाते. त्यामुळे खताची गुणवत्ता कमी होते. भेसळयुक्त खताचा वापर शेतीसाठी केल्यास नुकसान होतेच पण त्यासोबत जमिनीची सुपिकता कमी होते. युरियात भेसळ असल्यास पिकांना नत्राचा पुरवठा होत नाही. त्यामुळे पिकाची पाने पिवळी पडणे किंवा वाढ खुंटणे असे प्रकार होतात.

डीएपीतील भेसळीमुळे पिकांच्या मुळांची वाढ नीट होत नाही. तसेच पिकाची रोगप्रतिकार क्षमता कमी होते. भेसळीच्या खतांचा शेत जमिनीवर दूरगामी परिणाम होतात. शेतजमिनीचा सामू बिघडतो, जमीन नापीक बनत जाते आणि पुढील हंगामातही उत्पादन घटते. शेतीच्या उत्पन्नात घट आणि आर्थिक तोटा असे शेतकर्‍याचे मात्र दोन्ही बाजूंनी नुकसान होते. भेसळखोर अत्यंत चलाखीने व बेमालूपणे भेसळ करतात.

नामांकित खत कंपन्यांच्या बनावट गोण्या तयार करून त्यात भेसळयुक्त माल, खते भरली जातात. सील, बॅचनंबर आणि लेबल हुबेहुब खर्‍याखुर्‍या दिसत असल्याने शेतकर्‍यांना फरक समजून येत नाही. ग्रामीण भागातील छोट्या दुकानांमधून असा भेसळयुक्त खतांचा माल विकला जातो. अशिक्षित किंवा कमी माहीत असलेल्या शेतकर्‍यांना टार्गेट केले जाते. कमी किंमतीत जास्त माल असे आमिष दाखवून बोगस खते गळ्यात मारली जात आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news