

सातारा : कुटुंबामध्ये होणार्या कुरबुरी वाढल्या की त्याचे मोठ्या वादात रुपांतर होत आहे. किरकोळ कारणांबरोबरच सतत मोबाईलमध्ये व्यस्त राहणे, स्टेटस व प्रायव्हसी लॉक अशा कारणांमुळे स्मार्ट फोन अनेक घरात भांडणाचे मुख्य कारण ठरत आहे. पती-पत्नीतील नात्यात दुरावा निर्माण होत असल्याचे वास्तव चित्र आहे. अशाच एका प्रकरणात पत्नीच्या अफेअरमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले.
हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर पतीने पुराव्यादाखल सादर केलेले पत्नीचे मोबाईल चॅटिंग न्यायालयाने ग्राह्य धरून निकाल दिला. दरम्यान, महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्ह्यातील समुपदेशन केंद्रामध्ये मागील 3 वर्षात 1 हजार 348 तक्रारी दाखल झाल्या असून त्यामध्ये मोबाईल हेच घराघरातील संशयकल्लोळाचे कारण समोर आले आहे.
‘पुढारी’ने सामाजिक जाणिवेतून ‘कुटुंब संस्था वाचवूया’ ही चळवळ सुरू केली आहे. त्या अनुषंगाने शासकीय कार्यालयातील समुपदेशन केंद्रातील तक्रारींचा कानोसा घेतला असता धक्कादायक आकडेवारी मिळाली. त्यानुसार जिल्हा महिला बाल विकास विभागांतर्गत सातारा, फलटण व दहिवडी या तीन समुपदेशन केंद्रांमध्ये मागील तीन वर्षात 1हजार 348 तक्रारी दाखल झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामधील 103 केसेस मिटल्या असून कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत 674 प्रकरणे न्यायालयात दाखल करण्यात आली. त्यापैकी 296 प्रकरणांची सुनावणी होवून ती निकाली निघाली आहेत.
याबाबतच्या तक्रारींमध्ये मोबाईल हेच कुटुंबातील वादाचे मुख्य कारण असल्याचे चित्र आहे. एक उदाहरण समोर आले असून पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे हे कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले. या कुटुंबात सुखी संसाराची वाटचाल सुरू असताना पती-पत्नीमध्ये खटले उडू लागले. पत्नीचे अफेअर असल्याचा संशय पतीच्या मनात बळावला. त्यातून वाद विकोपाला गेला. शेवटी हे प्रकरण कोर्टात गेले. त्यावेळी संबंधित महिलेचा मोबाईल डाटा पुराव्यादाखल पतीकडून कोर्टात सादर करण्यात आला. त्यामध्ये पत्नीचे अफेअर स्पष्ट झाले. त्यामुळे हा निकाल पतीच्या बाजूने लागला. या दाम्पत्याला दोन मुले होती. न्यायालयाने या दोन्ही मुलांचा सांभाळ वडिलांकडे सोपवली. अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी या समुपदेशन केंद्रात दाखल आहेत.
इंटरनेट, स्मार्ट फोनमुळे जग जवळ आले हे खरे असले तरी त्याच्या अतिरेकामुळे समाजमाध्यमांसह कुटुंबामध्येही वादळे उठत आहेत. हसते खेळते कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. वाढत्या घटस्फोटाच्या प्रमाणामुळे कुटुंब व्यवस्था, लग्नसंस्थेचे अस्तित्व धोक्यात येत आहे. जिल्हा महिला बाल विकासच्या समुपदेशकांकडून पती-पत्नी व कुटुंबियांचे समुपदेशन करुन त्यांचे संसार पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याला आणखी बळकटी मिळण्याची गरज आहे.