

सातारा : एका बिल्डरसह (बांधकाम व्यवसायिक) चौघांनी दुसऱ्या बांधकाम व्यवसायिकाला 15 लाख रुपयांची खंडणी मागून मारहाण केल्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयित व तक्रारदार अगोदरचे बांधकाम व्यवयसायामध्ये पार्टनर होते. निखिल सूर्यकांत प्रभाळे, रणजित विलास कांबळे, हणमंत राजेंद्र पवाडे व अनोळखी एकाविरुद्ध समर्थ अनिल लेंभे (वय 30, रा. संभाजीनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 3 डिसेंबर रोजी झाली. समर्थ लेंभे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, संशयित निखिल प्रभाळे हा मित्र असून 2021 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत दोघांनी एकत्रित बांधकाम व्यवसाय केला होता; मात्र 2024 मध्ये बिझनेस पार्टनरशिप संपवून तक्रारदार यांनी स्वतंत्र बांधकाम व्यवसायिक म्हणून कामाला सुरुवात केली. दि. 3 डिसेंंबर रोजी तक्रारदार हे झेडपी चौक परिसरात संशयित चौघेजण त्यांच्या कारमध्ये येवून बसले.
‘तू आता लय मोठा झाला आहेस. आमच्याकडे आता बघत नाहीस. आम्हाला पैसे कोठून मिळणार? तू आम्हला दर महिन्याला 1 लाख रुपये द्यायचे व आता लगेच 5 लाख रुपये दे,’ असे म्हणाले. यावर तक्रारदार यांनी पैसे देण्यास नकार दिला. पैसे देण्यास नकार दिल्याने संशयितांनी तक्रारदार यांना शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. संशयितांनी तक्रारदार यांच्या कारची चावी घेवून तक्रारदार यांना कारमधून खाली उतरवले. तुझी कार देणार नाही. तसेच आम्हाला प्रत्येकी 15 लाख रुपये 25 डिसेंबरपर्यंत द्यायचे. पैसे दिले नाहीतर तुला साताऱ्यात राहू देणार नाही. तुला जिवे मारुन टाकीन, अशी धमकी दिली. वेळोवेळी संशयितांनी तक्रारदार खंडणी मागत असल्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.