उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढलेल्या मुक्कामाने चर्चा

सलग पाच दिवस गावी ठाण मांडून : राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण
उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढलेल्या मुक्कामाने चर्चा
File Photo
Published on
Updated on

बामणोली : राज्यातील राजकारण स्थिर दिसत असलं, तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे तांब या मूळ गावातील वाढलेल्या मुक्कामामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बुधवारी सायंकाळी ते आपल्या मूळगावी आल्यावर विश्रांतीसाठी आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आता पाच दिवस उलटून गेले तरी त्यांचा मुक्काम कायम आहे. शनिवारी मंत्री संजय राठोड, तर रविवारी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी त्यांची भेट घेतली. त्यामधील रहस्यही कायम असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे तांब या मूळ गावातील दौरे कायमच संशयकल्लोळात राहिले आहेत. बुधवारीही ते आपल्या परिवारासह गावी मुक्कामी आले. त्यांच्या समवेत पत्नी, मुलगा खा. श्रीकांत शिंदे, नातू हेही गावातच मुक्कामी आहेत. प्रारंभी तीन दिवस मुक्काम असल्याचे सांगण्यात आले, मात्र आता पाच दिवस होऊनही ते दर्‍यातच ठाण मांडून राहिले आहेत. त्यामुळे त्यांचा वाढलेला मुक्काम खरंच विश्रांतीसाठी आहे की, त्यामागे काही रणनीती आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी शनिवारी राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकतात का, असा प्रश्न विचारला, तेव्हा ते कधी नव्हे एवढे रागावलेले दिसले. गावी आल्यावर कायम शांत असणारे एकनाथ शिंदे ठाकरेंच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नावर चिडलेले पहायला मिळाले. राजकीय प्रश्न अजिबात विचारू नका असे त्यांनी सांगितले. तसेच याच प्रश्नाला अनुसरून पुनश्च सायंकाळी त्यांना राजकीय प्रश्न विचारले तर चालेल का? असे पत्रकारांनी विचारले असता त्यांनी दोन्ही हात जोडून नमस्कार घातला व शांत राहिले.

पाच दिवसांत शिंदेंनी गावी केलं काय?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टरने बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दरे या ठिकाणी आगमन झाले. त्यांनी निवासस्थानी जाऊन विश्रांती घेणे पसंद केले. गुरुवारी त्यांनी आपल्या शेत-शिवारामध्ये फेरफटका मारत काही ठिकाणी नव्याने वृक्ष लागवड केली व पत्रकारांशी संवाददेखील साधला. शुक्रवारी त्यांनी आपल्या नातवासोबत वेळ घालवला व नंतर आपल्या आईच्या पुण्यस्मरण दिनाच्या कार्यक्रमात हजेरी लावली. शनिवारी महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्यासमवेत कमराबंद चर्चा केली. त्याचबरोबर शिवार पाहणी करत परिसरातील देवदेवतांचे दर्शन घेत उतेश्वर देवस्थान या ठिकाणी सुरू असलेल्या रोप-वे व मंदिराच्या कामाची पाहणी केली. रविवारी पुनश्च त्यांनी उतेश्वर देवस्थान येथील रोप-वे व मंदिर परिसराची पाहणी केली व निवासस्थानी येऊन विश्रांती घेतली. मात्र, या पाचही दिवशी भेटायला आलेल्या प्रत्येकाला वेळ देत, त्यांचीदेखील कामे मार्गी लावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news