

फलटण : फलटण शहरासह तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे महसूल, कृषी व जिल्हा परिषद यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आले आहेत. सुमारे 50 कोटींचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
महसूल, कृषी, जिल्हा परिषद यंत्रणेतील सुमारे 300 ते 350 कर्मचार्यांकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्यानुसार 7328 शेतकर्यांनी शेतकर्यांच्या फळबाग सोडून बागायत क्षेत्रातील 2186.85 हे. क्षेत्रातील टोमॅटो, भेंडी, भाजीपाला, मका, कडवळ, बाजरी व अन्य बागायती पिकांचे 3 कोटी 71 लाख 76 हजार रुपये आणि 776 शेतकर्यांच्या 299.88 हे. क्षेत्रातील आंबा, पेरु, सीताफळ, डाळिंब वगैरे फळबागांचे 67 लाख 47 हजार रुपये असे एकूण 4 कोटी 39 लाख 247 हजार रुपये नुकसानीचा अंदाज आहे. फलटण, विडणी, बरड, तरडगाव महसूल मंडलातील 750 शेतकर्यांच्या जमीन खचणे, नदीपात्र किंवा ओढ्याच्या प्रवाह बदलामुळे 201.50 हे. क्षेत्रातील शेत जमीनी वाहून गेल्याने सुमारे एक कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वीज अंगावर पडल्याने, वीजेचा शॉक लागल्याने, घर, भिंत अंगावर पडल्याने व अन्य कारणाने 30 शेतकर्यांची 40 जनावरे व 11 कोंबड्या मृत झाल्या आहेत. त्यामध्ये 12 गाई, 5 म्हैस, 3 कालवड, 3 बैल, 1 बोकड, 16 शेळ्या आणि 11 कोंबड्यांचा समावेश आहे. या शेतकर्यांना 8 लाख 9 हजार रुपयांचे नुकसान भरपाई अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी सांगितले.
जिल्हा परिषद बांधकाम विभागाने केलेल्या पाहणीनुसार तालुक्यात 11 ग्राम तलाव व पाझर तलावांचे 62 लाख 50 हजार रुपयांचे, 40 रस्ते, पूल, डिव्हायडर, कॉज-वे यांचे 14 कोटी 38 लाख रुपयांचे, प्रा. शाळा खोल्या इमारत, प्रा. शाळा संरक्षक भिंत, छप्पर, मुतारी, अंगणवाडी दरवाजा, फरशी, आरोग्य वर्धीनी केंद्र इमारत वगैरेंचे 4 कोटी 68लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ते, पूल, घरे, भिंती, नळ पाणी पुरवठा योजना विहीर, स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारत वगैरे 2कोटी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग फलटणमार्फत अतिवृष्टीनंतर करण्यात आलेल्या पाहणीनुसार शिखर शिंगणापूर व सीतामाई घाट रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम करून दरड कोसळणे रोखणे, सुमारे 40 वर्षांपूर्वीचे जुने 7 पुलांची नव्याने उभारणी करणे, 22 रस्त्यांच्या 28.3 कि. मी. अंतरातील रस्त्याची दुरुस्ती करणे, 36 पूल व मोर्यांची दुरुस्ती व नवीन उभारणी वगैरे तात्पुरत्या व कायम स्वरुपी कामांसाठी 14 कोटी 99लाख रुपयांची आवश्यकता असल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आंबेकर यांनी व्यक्त केला आहे.