पेपर फुटीच्या अफवांमुळे वाढतोय संभ्रम
सातारा : दहावी व बारावी बोर्ड परीक्षा सुरू असल्याने आधीच हे विद्यार्थी तणावाखाली असतानाच सोशल माध्यमांवर पेपर फुटला, प्रश्नपत्रिका व्हायरल अशा अफवा पसरत आहेत. त्यामुळे परीक्षार्थींसह अवघ्या समाजमनामध्ये संभ्रम वाढत आहे. रात्रीचा दिवस करुन अभ्यास करणार्या मुलांचे लक्ष विचलित होत असल्याने विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधित यंत्रणेने अफवा पसरवणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांमधून होत आहे.
दहावी, बारावी म्हणजे विद्यार्थ्यांची कसोटी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्ता सिध्द करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागत आहेत. बोर्ड परीक्षेतील यशावरच उच्च शिक्षण व करिअरचा पाया उभारला जाणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय येवू नये यासाठी पालकांसह समाजातील सुज्ञ नागरिक घेत आहेत. सध्या बारावी बोर्ड परीक्षा मध्यावर आली असून दहावीचा फक्त भाषेचा पेपर झाला आहे. अशातच समाज माध्यमांवरील पेपर फुटीच्या अफवांमुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे.
जालन्यात दहावीचा पेपर तर बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच साशेल माध्यमावर व्हायरल झाल्याची अफवा पसरल्याने परीक्षार्थींचा गोंधळ उडाला. बोर्ड व्यवस्थापनाने ही अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी वारंवार होणार्या अशा घटनांमुळे अभ्यासाची लिंक तुटत आहे. त्यामुळे अशा घटनांबाबत विद्यार्थी व पालकांमधून नाराजी व्यक्त होत असून याबाबत ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.
प्रवेश परीक्षांच्या अभ्यासाला वेग...
बारावी विज्ञान शाखेच्या बहुतांश विद्यार्थ्यांचा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे कल वाढत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश परीक्षेतील गुणवत्तेवर केले जातात. या पार्श्वभूमीवर बारावी बोर्ड परीक्षेतील गणित, विज्ञानचे पेपर झाल्यामुळे उर्वरित पेपरच्या अभ्यासाबरोबरच सीईटी, जेईई मेन्स, नीट अशा प्रवेश परीक्षांच्या तयारीला वेग आला आहे.

