Satara murder case : चितळीत पूर्ववैमनस्यातून माजी सैनिकाचा खून

दोघा संशयितांना अटक; तणावाचे वातावरण
Murder Case
Murder CasePudhari
Published on
Updated on

खटाव/वडूज : खटाव तालुक्यातील चितळी येथे माजी सैनिक रणजित मदन निकम (वय 38) यांचा बुधवारी सायंकाळी निर्घृण खून झाल्याची घटना घडली. पूर्ववैमनस्यातून तलवार व कुऱ्हाडीने हल्ला करून निकम यांना गंभीर जखमी करण्यात आले. उपचारासाठी नेल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वडूज पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एकजण अल्पवयीन आहे.

पृथ्वीराज संभाजी पवार, पवन संतोष पवार, संतोष महादेव पवार व एक अल्पवयीन युवकाने मिळून खून केला असून, पृथ्वीराज पवार व पवन पवार यांना अटक करण्यात आली आहे. तर संतोष पवार याला ताब्यात घेतले असून भारत शशिकांत पवार पसार आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत रणजित निकम हे सुमारे चार वर्षांपूर्वी सैन्यदलातून सेवानिवृत्त झाले होते. ते गावी शेती करत होते.

चार महिन्यांपूर्वी त्यांचा गावातील पृथ्वीराज पवार यांच्याशी वाद झाला होता. त्याप्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या होत्या. तेव्हापासून पवार हे निकम यांच्यावर राग धरून असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास रणजित निकम हे दुचाकीवरून गावातील तालीम परिसरात गेले. काही वेळातच तेथे आरडाओरडा ऐकू आल्याने नातेवाईक व ग्रामस्थ धावत गेले. त्यावेळी पृथ्वीराज पवार व पवन पवार हे तलवारीने, तर भरत पवार हा कुऱ्हाडीने निकम यांच्यावर हल्ला करत असल्याचे दिसले. डोके, हात-पाय, पाठ व पोटावर वार केल्याने निकम रक्ताच्या थारोळ्यात पडले.

मारहाण सुरू असताना संतोष पवार व अल्पवयीन युवकाने हातातील कोयता दाखवून जमलेल्या लोकांना जवळ येऊ नका, अशी धमकी दिली. त्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. ग्रामस्थांनी जखमी निकम यांना तातडीने मायणी येथील रुग्णालयात नेले; मात्र तपासणीनंतर त्यांचा मृत्यू झाला असल्याचे मृत रणजित यांचे बंधू अभिजीत मदन निकम यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे हे पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहायक निरीक्षक विक्रांत पाटील यांनी पंचनामा करुन तपास सुरु केला. दिवसभर पोलिस गस्त सुरु ठेवण्यात आली होती. गावात शांतता राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भारत शशिकांत पवार हा अद्याप पसार आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक विक्रांत पाटील करत आहेत.

दरम्यान, चितळी येथील खून प्रकरणातील संशयित संतोष महादेव पवार, (वय 48) यास वडूज पोलिसांनी अळसन (ता. खानापूर, जि. सांगली) येथून ताब्यात घेतले आहे. दरम्यान खून प्रकरणामुळे गावात पोलीस छावणीचे स्वरूप आले असून सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news