

कराड : कराड शहरातील शिंदे हॉस्पिटलसमोर शनिवारी पहाटे घडलेल्या अपघातामागे थरारक खुनाचे षड्यंत्र असल्याचे उघड झाले. जलसंपदा विभागातील अभियंता लक्ष्मण श्रीरंग मंडले (वय ५४) यांच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या गुन्ह्याचा पर्दाफाश करत मृताची पत्नी आणि मेहुण्यालाच कटाचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न केले. लक्ष्मण मंडले यांची पत्नी सुरेखा लक्ष्मण मंडले (३६, रा. मनव, सध्या रा. कार्वे नाका) व मेहुणा संग्राम दिनकर चव्हाण (४०, रा. सुरूल पेठ, ता. वाळवा, जि. सांगली यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात, वैवाहिक वादातून पत्नीने भावाच्या मदतीने महिन्यापूर्वीच पतीच्या खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे. यासाठी दोन जणांना सुपारी दिल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास शिंदे हॉस्पिटलसमोर एका व्यक्तीला चारचाकी वाहनाने उडवल्याची माहिती कराड शहर पोलिसांना मिळाली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना लक्ष्मण मंडले हे गंभीर जखमी अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत लक्ष्मण मंडले यांची पत्नी सुरेखा मंडले अपघातस्थळी दाखल होत्या. लक्ष्मण मंडले यांनी आदल्या रात्री मी कराडला येत आहे, मला न्यायला कोल्हापूर नाक्यावर ये असे फोनवरून त्यांना सांगितले होते. सुरुवातीला सुरेखा हिने पोलिसांना ही अपघाताची घटना असल्याचे सांगितले. मात्र घटनास्थळावरील परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीतून पोलिसांना संशय आला. तपासात असे आढळले की, एक कार मंडले यांच्या पाठीमागून आली, त्यांना उडवून दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील बॅग आणि साहित्य घेऊन पळ काढला. इतकेच नव्हे तर काही वेळाने पुन्हा घटनास्थळी येऊन जखमी अवस्थेत पडलेल्या मंडले यांच्या अंगावर वाहन घालून त्यांना ठार मारले असे पोलिसांनी सांगितले.
लक्ष्मण मंडले हे शहापूर (जि. ठाणे) येथे उपविभागीय जलसंपदा अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मनव येथील रहिवासी होते. सध्या ते थोरात हॉस्पिटल परिसर कार्वे रोड येथे राहात होते. कराड पंचायत समितीमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागात शाखा अभियंता म्हणून ते कार्यरत होते. मागील वर्षी कराड येथून त्यांची बदली प्रमोशनवर शहापूर (जि. ठाणे) येथे झाली होती.
सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरचे वरिष्ठ पो.नि. दत्तात्रय दराडे, सहायक पो.नि. विजय गोडसे, स.पो.नि. अशोक भापकर, नीलेश तारू, श्रद्धा आंबले, जयश्री वाघमोडे, उपनिरीक्षक दीपक वागवे, कृष्णा डिसले, पोलिस अंमलदार अशोक वाडकर, सतीश पाटील, संदीप कुंभार, सज्जन जगताप, अनिल स्वामी, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, धीरज कोरडे, मोहसील मोमीन, सोनाली पिसाळ यांनी कामकाज पाहिले.