

सातारा : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहर व परिसरात विद्युत पुरवठा करणार्या महावितरणच्या तारांना झाडांच्या फांद्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे पाऊस व वारा सुरू होताच वीजपुरवठा खंडित होत आहे. याबाबत अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीच दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त नागरिकांनी प्रतापगंज पेठेतील कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
वादळामुळे या तारांमध्ये फांद्या अडकून त्या तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचा तसेच घरालगत असल्याने परिसरातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. धोकादायक स्थितीत विजेच्या खांबांना विळखा घातलेल्या फांद्या तोडण्याची मागणी केली जात आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच महावितरण ज्या ठिकाणी उघड्या विद्युत तारा किंवा पथदिवे यांना अडथळा ठरणार्या झाडांच्या फांद्या व वेलींची छाटणी करतात. मात्र, यंदा ही कामे झालेले नाहीत, त्यामुळे पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या वेली या थेट खांबावर गेल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत डीपीसुद्धा वेलींनी झाकल्या आहेत.
विद्युत ताराही झाडांच्या विळख्यात सापडल्या आहेत. वीजप्रवाह सुरू झाल्यानंतर तो झाडांच्या फांद्यातून व वेलीतून खाली उतरू शकतो. शहरातील अनेक भागातील खांब हे रस्त्यालगत व लोकवस्तीत असल्यामुळे चुकून एखाद्याचा हात लागला किंवा वीजप्रवाह ओल्या झालेल्या जमिनीवर लांबवर पसरत गेला तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो.
तसेच शॉर्टसर्किट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच जर त्यांची छाटणी करण्यात आली असती तर ही परिस्थिती उद्भवली नसती. सध्या पावसाने काहीशी उघडीप दिल्याने शहरातील वेली व झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी, अशी मागणी होत आहे.