

सातारा : मधमाश्यांच्या पेट्या शेतात, जंगलात, बागेत ठेवल्या जात असतात त्यावेळी मधमाश्यांच्या संरक्षणासाठी झटका मशीनचा वापर केला जातो. प्रामुख्याने अस्वल व जंगली प्राण्यांपासून मधमाश्यांची पेटी वाचवण्यासाठी केला जातो. ही मशीन सौरऊर्जेवर काम करत आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दाभे, रेणोशी, खरोशी या गावातील ८ ते १० शेतकऱ्यांनी हा नाविन्यपूर्ण प्रयोग राबवल्याने या मशीनच्या वापरामुळे अस्वलासह अन्य जंगली प्राण्यांपासून या मधपेट्या वाचवण्यास मदत झाली आहे.
सातारा जिल्ह्यात दुर्गम भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात मधमाशी पालन व्यवसायाकडे वळले आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील मधाची गोडी राज्यभर दरवळू लागली आहे. या मधमाशीपालनातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू लागले आहे. जंगली, डोंगरी व दुर्गम भागात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा फटका मधमाशीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना बसत आहे.
मधमाश्यांच्या पेट्यांचे रानडुक्कर, अस्वल किंवा इतर वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी सोलर झटका मशीन हा एक अतिशय प्रभावी आणि सुरक्षित उपाय काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात राबवला आहे. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दाभे, रेणोशी, खरोशी या गावातील ८ ते १० शेतकऱ्यांनी हा नाविन्यपूर्ण प्रयोग राबवला आहे. या झटका मशीनला विजेची गरज नसल्याने ती सोलर पॅनलवर चार्ज होत आहे. सोलरवर चालत असल्याने विजेचे बिल येण्याचा प्रसंग नाही.
मधपेट्यांच्या संरक्षणासाठी रात्री शेतात थांबण्याची गरज नाही. प्राण्यांना किंवा मानवाला जीवघेणा धक्का न बसता केवळ सौम्य झटका बसतो, ज्यामुळे प्राणी या ठिकाणापासून दूर पळतात. मधमाशी पेट्यांच्या भोवती बारीक तारांचे कुंपण करून ही मशीन जोडली जाते. रानडुक्कर, अस्वल, माकड व अन्य वन्य प्राण्यांपासून सुरक्षित कशा राहतील, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वन्यप्राण्यांपासून तसेच चोरट्यांपासून पेट्यांचे संरक्षण होण्यास मदत होत आहे. या झटका मशीनच्या वापरामुळे मधमाशी पालक शेतकऱ्यांना पेट्यांच्या नुकसानीपासून मोठा दिलासा मिळण्यास मदत झाली आहे.
दाभे ता. महाबळेश्वर येथील प्रकाश जाधव यांनी सन २००२ पासून मध व्यवसाय सुरू केला आहे, सध्या त्यांच्याकडे ३२० वसाहतींसह मधाच्या पेट्या आहेत. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केला. झटका मशीन बसवल्यामुळे मध पेट्या वन्यजीव प्राण्यांपासून सुरक्षित राहिल्या. या मशीनमुळे अस्वल, गवा व अन्य वन्यप्राणी देखील येऊ शकत नाहीत. तथापि पावसाळ्यात या मशीनची बॅटरी उतरते ती पुन्हा चार्ज करावी लागते. झटका मशीनमुळे मध उद्योगाला जीवदान मिळाले आहे.
तज्ज्ञांचे आणि शेतकऱ्यांचे मत "जंगल भागातील मध पेट्यांमधून व्यवसाय सुरू करणाऱ्या मधमाशी पालकांना झटका मशीन सारखी यंत्रणा वन विभागाच्या सल्ल्याने व मदतीने व्यवस्थितपणे कार्यान्वित केल्यास राज्यातील मध माशापालन व्यवसायाला अधिक बळ आणि नव संजीवनी मिळेल."
— दिग्विजय पाटील (माजी संचालक तथा विशेष कार्य अधिकारी)
"मधमाश्यांच्या संरक्षणासाठी अस्वल, माकड, रानडुक्कर, मुंगूस व अन्य वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी मधमाशा पालन करणारे शेतकरी झटका मशीनचा वापर करत आहेत. या मशीनमुळे प्राण्यांना जीवितहानी न होता केवळ सौम्य झटका बसतो आणि ते पळून जातात. या मशीनमुळे मधपेट्यांचे संरक्षण होण्यास मदत होत आहे."
— प्रकाश जाधव, शेतकरी