

उंडाळे : कराड दक्षिण विभागातील घोगाव, उंडाळे, जिंती, आकाईवाडी, धरणावरील विद्युत पंपांच्या केबल, विद्युत पंप आणि शेतातील ठिबक साठी बसविण्यात आलेले फिल्टर यासह शेती साहित्य चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. आठ ते दहा दिवसात सुमारे एक कोटी रुपयाच्या साहित्याची चोरी या टोळीने केली आहे. मंगळवारी रात्री घोगाव धरणावरील तेरा ते चौदा, बुधवारी रात्री उंडाळे धरणावरील बारा ते पंधरा विद्यूत पंपाच्या केबलची चोरी झाली आहे. या चोरीने शेतकरी हवालदिल झाला असून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या चोरीमुळे ऐन उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा होत नसल्याने पिके वाळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी घोगावसह दक्षिणेतील घोगाव धरण परिसरातील दहा ते पंधरा शेतकऱ्यांची 800 ते 1000 मीटर विद्युत केबल, उंडाळे येथील धरणावरील श्रमिक मुक्ती दलाचे राज्य पदाधिकारी व कराड तालुका काँग्रेसचे सरचिटणीस उदय पाटील यांचा साडेसात एचपीचा विद्युत पंप व धरणावरील दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या सुमारे एक हजार मीटर विद्युत वाहक केबल, आकाईवाडी, जिंती, धरणावरील बहुतांश शेतकऱ्यांचे विद्युत पंप व केबल यासह ठिबक सिंचनाचे फिल्टर व शेती साहित्याची सुमारे एक कोटी रुपये साहित्याची चोरी चोरट्यांनी केल्याने शेतकऱ्याचा आर्थिक कणाच मोडला आहे.
कराड दक्षिण परिसरात वर्षभरापासून सातत्याने शेतकऱ्यांच्या विद्युत केबल, विद्युत मोटारी व शेती साहित्याची चोरी सातत्याने सुरू आहे. याबाबत पोलिसांत तक्रार करूनही पोलिसातून कोणताही तपास केला जात नाही. त्यामुळे शेतकरी वैतागला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजपर्यंत केलेल्या तक्रारीचा कोणताही तपास पोलिसांकडून न झाल्याने शेतकऱ्यांचा पोलिसांवरील विश्वास कमी होत असून याबाबत वरिष्ठांनी यात लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
धरण परिसरात शेतीला पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेल्या विद्युत पंपास जोडलेल्या केबलची चोरी होण्याच्या सातत्याने घटना घडत आहेत. मंगळवारी रात्री घोगाव धरण परिसरातील सुमारे दहा ते पंधरा शेतकऱ्यांच्या मालकीच्या अंदाजे एक हजार मीटर लांबीच्या विद्युत केबलची अज्ञात चोरट्यानी चोरी केली. या चोरीमुळे सुमारे सहा ते सात लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. घोगाव धरण परिसरातील बळवंत पांडुरंग जाधव, संजय पांडुरंग देशमुख, बाळकृष्ण शंकर पाटील, अरुण रामचंद्र पाटील, जयसिंग रामचंद्र पाटील, शंकर हरी पाटील, बाळासो मारुती साळुंखे, आनंदराव रामचंद्र बागट, भीमराव प्रल्हाद साळुंखे, मोहन चोरमारे, मोहनराव पाटील या शेतकऱ्यांची केबल चोरी झाली आहे.