

बामणोली : उद्धव ठाकरे गटाच्या कोणाही खासदारांशी माझी बैठक झालेली नाही. याबाबत वृत्त प्रसिद्ध करताना माध्यमांनी शहनिशा करायला हवी. कुठल्याही खासदारांच्या बरोबर बैठक झालेली नाही, हे मी सकाळीदेखील सांगितलेले आहे. मी असं कुठल्याही बैठका लपून-छपून करत नाही. माझं सगळं काम हे उघड असतं, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या खासदारांसोबत बैठक झाल्याचे वृत्त फेटाळून लावले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीन दिवसांसाठी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) या आपल्या मुळ गावी मुक्कामी आहेत. दुसऱ्या दिवशी ना. एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ठाकरे गटाच्या खासदारांसोबत माझी बैठक झालेली नाही. आमच्या खासदारांची बैठक मी ऑनलाईन घेत आहे.
एसआयआर प्रक्रियेबाबत मी त्यांच्याशी चर्चा करत आहे. माध्यमांनी कुठल्या तरी वृत्ताचा आधार घेऊन एखादी बातमी चालवणे टाळलं पाहिजे. वस्तुस्थिती मांडण्याचा मीडिया चांगला प्रयत्न करत असताना ब्रेकिंग न्यूज आणि सनसनाटी चालवत असताना त्या बातमीची खात्री आणि शहानिशा करूनच बातम्या दिल्या पाहिजेत. चुकीच्या बातम्या टाळल्या पाहिजेत, असेही ना. एकनाथ शिंदे म्हणाले.