‘श्रीराम’वर सभासदांच्या मालकीसाठी प्रयत्नशील

रणजितसिंह ना. निंबाळकर : वारसांना मतदानाचा हक्क मिळवून देणार
Satara News |
रणजितसिंह ना. निंबाळकरPudhari File Photo
Published on
Updated on

फलटण : शेतकर्‍यांच्या मालकीच्या व सहकारी तत्त्वावर असणार्‍या श्रीराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पारदर्शक पद्धतीने व्हावी. मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा. यासाठी आम्ही आता न्यायालयीन पातळीवर लढाई सुरू केली आहे. कारखान्याची निवडणूक प्रशासक नेमून पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी लढत असलेले विश्वासराव भोसले व नरसिंह निकम यांच्या पाठीशी उभे आहोत. कोणत्याही परिस्थितीत श्रीराम कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, श्रीराम कारखाना सभासदांच्या मालकीचा आहे आणि तो सभासदाच्या मालकीचा ठेवण्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली आहे. अडीच ते तीन हजार मयत सभासदांच्या वारसांना मतदानाचा हक्क मिळावा ही आमची भूमिका आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे भूमिका मांडली परंतु तेथे पूर्ण यश आले नाही. या विषयांसदर्भात विश्वासराव भोसले यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. नियत वेळेत कारखाना निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यास श्रीराम कारखान्यावर निश्चितच प्रशासक येईल. त्यानंतर सभासदांच्या बाबतीत योग्य तो निर्णयही घेतला जाईल.

विश्वासराव भोसले म्हणाले, श्रीराम कारखान्याने नियमांचे उल्लंघन करून मयत सभासदांच्या वारसांना जाणीवपूर्वक सभासदत्व मिळू दिले नाही. प्रारूप सभासद यादीवर आपण हरकत घेतली होती. सुनावणीमध्ये मयत सभासदांची नावे कमी करण्याचा आदेश निवडणूक अधिक अधिकार्‍यांनी दिला त्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मयत सभासदांच्या वारसांना नियमानुसार कारखान्याने शेअर्स ट्रान्सफरबाबत सूचना द्यायला हवी होती. तसे न करता बोगस सभासद वाढवण्यात आलेले आहेत. त्यामुळे कारखान्याच्या सभासदांच्या वारसांना सभासदत्व मिळवून मतदानाचा अधिकार देण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा सुरू केला आहे. अनेक बाबीतील अनियमितता दूर करण्याबरोबरच पात्र सभासदांना मतदानाचा हक्क निश्चित मिळेल, असेही ते म्हणाले.

शिवरूपराजे खर्डेकर म्हणाले, मयत सभासदांच्या वारसांना सभासदत्व देण्याबाबत संचालक मंडळाने सकारात्मक भूमिका घेतली नाही. संचालक मंडळाने जाणीवपूर्वक मयत सभासदांच्या वारसांना कारखान्याच्या सभासदत्वापासून वंचित ठेवल्याने हा लढा सुरू करावा लागला आहे. याशिवाय ज्यांना जमिनी नाहीत अशांना सभासद केल्याचाही आरोप त्यांनी केला. यावेळी आ. सचिन पाटील, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, अ‍ॅड. नरसिंह निकम उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news