

कराड : बहुचर्चित यशवंत बँक अपहारप्रकरणी ईडीच्या विशेष पथकांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास कराड आणि फलटण तालुक्यांत पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. बँकेतील कथित 112 कोटींच्या अपहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. बँकेशी निगडित दोन संशयितांकडून अपहाराची माहिती घेतली जात आहे. कराडमध्ये चार आणि फलटणमध्ये एका ठिकाणी कागदपत्रांसह अन्य आवश्यक बाबींची रात्रीपर्यंत पडताळणी सुरू होती. याबाबत ईडीकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तरीही छाप्याच्या केंद्रस्थळी असलेली यशवंत बँक ही सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्याशी निगडित असल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल 112 कोटींच्या अपहाराचा कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ऑक्टोबरमध्ये राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांविरोधात सनदी लेखापाल सी.ए. मंदार देशपांडे यांनी फिर्याद दिली आहेे. यापैकी 22 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मागील आठवड्यात फेटाळला आहे. तत्पूर्वीच काही ठेवीदार आणि खासदार मेधा कुलकर्णी यांनी याप्रकरणी आवाज उठवत संशयितांची ईडीकडून चौकशी करावी, अशी मागणी केली होती.
त्यानंतर आता या गुन्ह्याचा तपास गतीने सुरू झाला असून, याप्रकरणी ईडीकडून कराडमध्ये चार ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. महिला अधिकाऱ्यांसह शस्त्रधारी जवान छापे टाकलेल्या ठिकाणी असल्याने या कारवाईची चर्चा सुरू झाली. कराडमधील वाखाण परिसर, सोमवार पेठेसह गजानन हौसिंग सोसायटी आणि विंग परिसरात एका ठिकाणी अशा चार ठिकाणी ईडीकडून शोध मोहिम राबविण्यात आली. त्याचबरोबर कराड व फलटण येथील यशवंत बँकेच्या शाखेत या अपहार प्रकरणाशी निगडीत कागदपत्रांची तपासणी ईडीकडून सुरू होती. चौकशीसाठी दोघा संशयितांना सोबत घेण्यात आले असून त्यांच्याकडून माहिती घेत अपहार प्रकरणाशी निगडीत कागदपत्रांची छाननी सुरू होती. त्यामुळेच याप्रकरणी आता प्राथमिक चौकशीनंतरच ईडीकडून पुढील कार्यवाही होणार असून कोणती कारवाई होणार ? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.
यशवंत बँकेच्या 2014 ते 2025 या कालावधीत झालेल्या व्यवहारांचे वैधानिक लेखापरीक्षण करताना हा गैरव्यवहार झाल्याचा दावा पोलीस ठाण्यातील फिर्यादीत करण्यात आला आहे. बोगस कर्ज प्रकरणे, बनावट कागदपत्रे, तारण न घेता कर्जवाटप करून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. जुनी थकबाकी खाती बंद दाखवून नवीन खाती उघडून अन्य लोकांकडे निधी वळवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यामुळेच याबाबतची माहिती ईडीकडून घेतली जात असल्याची चर्चा आहे.