

कराड : यशवंत बँकेतील 112 कोटींच्या अपहारप्रकरणी ‘ईडी’कडून मंगळवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतरही कराड, फलटणला सुमारे 16 तासांहून अधिक काळ झाडाझडती सुरू होती. या प्रकरणाशी आवश्यक कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. तसेच याप्रकरणी ईडीकडून पाचजणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ शौनक ऊर्फ विठ्ठल गोविंद कुलकर्णी (रा. पुणे) याला गजाआड केले आहे. कुलकर्णी याला सोमवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
कराड शहर पोलिस ठाण्यात 12 ऑक्टोबरला यशवंत बँकेतील 112 कोटींच्या अपहारप्रकरणी शेखर चरेगावकर, शार्दूल ऊर्फ मुकुंद चरेगावकर, चरेगावकर यांचा दत्तक बंधू विठ्ठल ऊर्फ शौनक कुलकर्णी याच्यासह 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्यासह ठेवीदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही याप्रकरणी भेट घेत ईडीकडून सखोल चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी पहाटेपासून कराड, फलटण परिसरातील पाच ठिकाणी ईडीने छापे टाकले.
मंगळवारी सकाळी कराडमधील आणि फलटणमधील बँकेच्या शाखेत सुरू असलेली चौकशी मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरूच होती. या दरम्यान या प्रकरणाशी निगडीत काही कागदपत्रे ईडीच्या अधिकार्यांनी ताब्यात घेतली आहेत. तसेच याप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या शार्दुल उर्फ मुकूंद चरेगावकर यांच्यासह दोघांना सोडण्यात आले असून पाच जणांना चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना करत ईडीचे अधिकारी मुंबईकडे मार्गस्थ झाले असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, ईडीकडून झाडाझडती सुरू असतानाच मंगळवारी शेखर चरेगावकर यांचा दत्तक भाऊ शौनक उर्फ विठ्ठल कुलकर्णी याच्यासह आठ जणांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते. त्यानंतर सातारा आर्थिक गुन्हे शाखेकडून मंगळवारी रात्रीच शौनक उर्फ विठ्ठल याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. बुधवारी दुपारी त्याला कराडच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर सोमवार, 29 डिसेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.