

सातारा : फॅशन अन् तरुणाई हे समीकरणच बनलं आहे. आधुनिकतेची आस लागलेल्या तरुणाईमध्ये फॅशन फंडा वाढत आहे. अलीकडे महाविद्यालयीन युवकांसह सर्वच तरुण वर्गात कानात बाळी अन् कपाळावर टिळा लावण्याची आवड वाढत आहे. शिक्षण क्षेत्रात यावरुन बरीचशी वादळं उठली असली तरी तरुणाईमध्ये ही क्रेझ कायम आहे.
वार्याशी स्पर्धा करत धुमस्टाईलने वाहने चालवण्याचे धाडस तरुणाईमध्ये आहे. कधी-कधी ते जीवावर बेतते. मात्र, तरुणाई मागे हटत नाही. इतरांपेक्षा काहीतरी हटके करण्याची उर्मी तरुणाईमध्ये आहे. त्यामुळे कोणतीही नवीन फॅशन आली की तिचे अनुकरण करणे हा तरुणाईचा हक्कच बनला आहेे. त्यामुळेच तरुणाईची आवड निवड डोळ्यासमोर ठेवूनच नवनवीन फॅशन तयार होत असतात.
बाजारपेठेत मागणी तसा पुरवठा हे तत्त्व अनुसरले जात असले तरी तरुणांच्या कल्पनांना प्राधान्य दिले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये जशी कपाळावर टिळा लावण्याची क्रेझ महाविद्यालयीन युवकांसह सर्वच युवा वर्गात वाढत आहे. तसेच सर्रास तरुणाईच्या कानात सोन्याची बाळी घातली जात आहे. राजा-महाराजांच्या व नंतर पेशवाईच्या काळात श्रीमंतीचे प्रतीक म्हणून भिकबाळी घातली जाई. कालांतराने भिकबाळीची प्रथा मागे पडली, मात्र आधुनिक जीवनशैलीत या भिकबाळीची जागा कानातल्या बाळीने घेतली आहे. बहुतांश तरुणाईच्या कानात सोन्याची बाळी दिसत आहे. महाविद्यालयीन युवकांमध्येही लाल गंधाचा टिळा लावण्याची क्रेझ दिसत आहे.
पूर्वीच्या प्रथा परंपरा यांच्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन जडला आहे. कपाळावर गंध लावणे किंवा कानात भिकबाळी घालणे यामागेही गहन अर्थ दडला आहे. फॅशनच्या नावाखाली केवळ अंधानुकरण न करता तो अर्थ समजून घेतल्यास तरुणाईची पावले घसरणार नाहीत. दोन्ही भुवईच्यामध्ये असलेल्या शिरेवर दाब पडून मस्तिष्कची स्मृती चेतना जागृत राहून एकाग्रता वाढते. मेंदू शांत राहतो, आत्मविश्वास व सकारत्मकता वाढते. म्हणून कपाळावर तिलक लावणे लाभदायी असते.