मद्यधुंद पोलिसाने एकाला चिरडले

सर्कलवाडी येथील घटना; ऐन यात्रेतच गावावर शोककळा
Satara Accident News |
मृत रमेश लक्ष्मण संकपाळFile Photo
Published on
Updated on

पिंपोडे बुद्रुक : सर्कलवाडी (ता.कोरेगाव) येथे शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास घरासमोर मद्यधुंद अवस्थेत असणार्‍या पोलिसाच्या कारने एकाला चिरडल्याची घटना घडली. या अपघातात रमेश लक्ष्मण संकपाळ (वय 55) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी वाठार पोलिसांनी संशयित पोलिसाला अटक केली आहे. ज्ञानेश्वर बाबुराव राजे (रा. वाघोली, ता. कोरेगाव) असे संशयित पोलिसाचे नाव आहे. तो सध्या भुईंज पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी ऋतूराज संकपाळ यांनी फिर्याद दिली आहे.

गुरुवार दि. 24 व शुक्रवार दि.25 एप्रिल हे दोन दिवस सर्कलवाडी गावची यात्रा होती. गुरुवारी रात्री ग्रामदेवतेचा छबिना सुरू होता. त्या छबिन्याला रात्रभर रमेश संकपाळ गेले होते. पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास छबिन्यातून येऊन ते आपल्या घरासमोर झोपले होते.

सर्कलवाडी गावातून वाठार स्टेशन- वाई रस्ता जातो. या मुख्य रस्त्यापासून संकपाळ यांचे घर साधारणपणे 50 ते 60 फूट अंतरावर आहे. याच रस्त्याने ज्ञानेश्वर राजे कारमधून (क्र. एम. एच. 12. जी. आर. 2926) मद्यधुंद अवस्थेत वाठार स्टेशनच्या दिशेने निघाले होते. यावेळी कारवरील नियंत्रण सुटून त्यांची कार मुख्य रस्ता सोडून रस्त्याच्या बाजूला पडलेल्या मुरुमाच्या ढिगार्‍यावरून भरधाव वेगात पुढे गेली. यात आपल्या घरासमोर झोपलेल्या संकपाळ यांना चिरडले. गाडीखाली सापडलेल्या संकपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. कारचे पुढील चाका आणि पत्रा याच्यामध्येच त्यांचे डोके अडकून पडले होते. त्यामुळे कारचे चाक खोलून अडकलेला मृतदेह बाहेर काढावा लागल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. वाठार स्टेशनचे सपोनि अविनाश माने यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ऐन यात्रेदिवशीच घडलेल्या या घटनेने संकपाळ कुटुंबीयांसह सर्कलवाडी गावावर शोककळा पसरली आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत संकपाळ कुटुंबीय दैनंदिन आयुष्य जगत असल्याने व कर्ता पुरुष अपघातात गेल्याने कुटुंब कोलमडून पडले आहे.

पोलिस कर्मचारी राजे पहाटेच्यावेळी भरधाव का निघाला होता...

संशयित ज्ञानेश्वर राजे हा भुईंज पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. तो मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तर एवढ्या पहाटे तो भरधाव वेगाने घराच्या दिशेने कशासाठी निघाला होता. त्याला रात्रपाळी होती का? रात्रपाळी किती वाजता संपते? अशा शंका ग्रामस्थ व संकपाळ कुटुंबीय उपस्थित करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news