

कराड : दारूच्या नशेत कार चालविणार्या डॉक्टरने उडविल्याने वृद्धेसह तिघे जखमी झाले आहेत. बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास ढेबेवाडी फाटा परिसरात घडलेल्या या घटनेनंतर मद्यपी डॉक्टरला पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी त्याने नशेत पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
राजाराम जगताप असे मद्यपी डॉक्टरचे नाव असून, तो कार्वे परिसरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. या माहितीवरून पोलिसांकडून सत्यता पडताळण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती. जगताप हे त्यांची कार घेऊन ढेबेवाडी बाजूकडून मलकापूरमधील ढेबेवाडी फाट्याकडे भरधाव येत होते. त्यावेळी डॉक्टरचे नियंत्रण सुटल्याने कार मार्गालगत असणार्या तिघांना धडकली.
या धडकेत एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली आहे, तर अन्य दोन जखमींची माहिती पोलिस घेत होते. रात्री आठच्या सुमारास संबंधित डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना संबंधित डॉक्टरने पोलिसांना प्रतिकार केला. तेथे डॉक्टरचा एक नातेवाईक उपस्थित होता. मात्र नशेत असल्याने डॉक्टर त्यालाही जुमानत नव्हता. अखेर सव्वा आठच्या सुमारास पोलीस गाडीत जबरदस्तीने बसवित त्याला वैद्यकीय तपासणीसाठी सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात नेण्यात आले होते.