

मारूल हवेली : मल्हारपेठ (ता.पाटण) येथील बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आहे. परिणामी, भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात शेवग्याने शंभरी गाठली असून, दोडकाही भाव खाऊन जात असल्याचे दिसून येत आहे.
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मल्हारपेठसह परिसरातील अनेक व्यापारी आणि ग्राहकांसह शेतकरी देखील खरेदी-विक्रीसाठी येथे मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे बुधवारी भरणार्या आठवडी बाजारात लाखोची उलाढाल होते, येथील आठवडी बाजारामध्ये धनधान्यसह, भाजीपाला, किराणा, कपडे, रोपांचा बाजार यासारख्या सर्व गोष्टींची उपलब्धता असते. त्यामुळे ग्राहकांचा ओढा देखील मोठा आहे.
यावर्षी पावसाने उघडीप न दिल्याने पाटण तालुक्यातील खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. तसेच सततच्या पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादन घटले आहे. त्यामुळे येथील बाजारामध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणामध्ये घटली. बुधवारी भरलेल्या आठवडी बाजारामध्ये भाजीपाल्याच्या दराने मोठ्या प्रमाणात उच्चांकी गाठली. त्यामुळे गृहिणींसह सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.
भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकर्यांना दिलासा मिळत आहे. बाजारामध्ये शेवग्याचा दर 100 ते 120 रुपये किलो पर्यंत पोहोचला. तर घेवडा, दोडका, कारले, गवार, पावटा, भोपळ्याने ही शंभरी गाठली आहे. पावशेर भाजीपाला खरेदी करताना ग्राहकांना सरासरी 20 ते 30 रूपये मोजावे लागत आहेत. परिणामी सर्वसामान्य माणसाला याचा फटका बसला आहे.
दक्षिण भारतातून येणार्या नारळांचे उत्पादन कमी झाल्याने कोरड्या नारळासह, खोबरे आणि खोबरे तेलही महागले आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चटका बसत आहे. 220 रुपये किलो मिळणारे खोबरे हे 400 रुपयांपर्यंत गेले आहे. सध्या खोबर्याची किरकोळ विक्री 360 ते 400 रूपये दराने केली जात आहे.