

सातारा : यंदा विदर्भ-मराठवाडयासह महाराष्ट्रावर दुष्काळाची दाहकता वाढली आहे. महाराष्ट्रातील ३०० पेक्षा जास्त तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. परतीच्या पावसाने दगा दिल्याने यंदा प्रचंड अवर्षण परिस्थिती निर्माण झाली आहे. जीवन मरणाचा संघर्ष दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जलमंदिर पॅलेस येथील साजरा होणारा शाही विजयादशमी सिमोल्लंघन सोहळा साधेपणाने साजरा केला जाणार असल्याची माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली.
ऐतिहासिक दिर्घ परंपरा असलेला सातारचा विजयादशमीचा शाही सिमोल्लंघन सोहळा हा फक्त राजघराण्याचा नसून तो संपूर्ण सातारकरांचा सोहळा म्हणून साजरा केला जात असतो. श्री भवानी तलवारीचे आणि आई तुळजाभवानीचे विधिवत पूजन, श्री भवानी तलवारीची शाही पालखी मिरवणूक, सातारा पोवईनाका येथे तत्कालीन वेशीवर पूजन आणि परत जलमंदिर पॅलेस येथे ही शाही मिरवणूक आल्यावर स्वागत औक्षण, यथोचित पूजन झाल्यावर विजयादशमीनिमित्त आपटयाचे सोने स्विकारण्याचा सोहळा मोठया दिमाखात आणि डामडौलात साजरा केला जात असतो. गत काही वर्षापासून शासनही या शाही सोहळयामध्ये सहभागी होत असून शासनाव्दारे जलमंदिर पॅलेस येथे पोलिसबॅन्ड पथकाव्दारे शासनाकडूनही सलामी दिली जात आहे.
मात्र, यंदा विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्जन्यमान पूर्ण पावसाळयात कमी झाले आहे. विदर्भ मराठवाडयात प्यायला पाणी मिळणे आजच कठीण बनले आहे. महाराष्ट्रातील ३०० पेक्षा जास्त तालुके दुष्काळाने होरपळत आहेत. बळीराजाची बिकट अवस्था झाली आहे. जनावरे जगवणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत शाही सिमोल्लंघन सोहळा दिमाखात साजरा करणे योग्य वाटत नाही. प्रथा परंपरेप्रमाणे सिमोल्लंघन सोहळा होईल. परंतु, साधेपणाने केला जाईल. अनावश्यक खर्चाला फाटा देवून कार्यकर्ते-नागरिकांनीही दुष्काळग्रस्तांसाठी मदत करावी, असे आवाहन खा. उदयनराजेंनी केले आहे.